माधुरीची स्माईल जितकी दिलखेचक आहे तितकंच तिचं एकूणच सौंदर्य वयाच्या या टप्प्यावरही अनेकांना घायाळ करणारं आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने मागील ४ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी माधुरी म्हणजेच बॉलिवूडच्या धक धक गर्लचे सौंदर्य वयाच्या ५० व्या वर्षीही आजही कायम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा आहार आणि संतुलित जीवनशैली. माधुरीची त्वचा, स्माईल, फिगर याबद्दल नेहमीच बोलले जाते. पण केस हाही तिच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. तिचे केस अतिशय दाट आणि जाड असून त्यासाठी माधुरी काय करते हे मात्र आपल्याला माहित नाही. अभिनेत्री म्हटल्यावर केसांवर सतत होणाऱ्या ट्रिटमेंटस ओघानेच आल्या (Hair Care Tips By Actress Madhuri Dikshit Home Made Hair Mask) .
मात्र तरीही वेळ मिळेल तेव्हा घरगुती उपाय करुन माधुरी आपल्या केसांचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करते. माधुरी कायमच केसांसाठी आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी काही ना काही नैसर्गिक उपाय करत असल्याचं आपण ऐकतो. नुकत्याच तिच्या यु ट्यूब चॅनेलवरुन तिने आपण केसांसाठी करत असलेल्या उपचारांविषयी माहिती दिली. यामध्ये तिने अतिशय सोपा असा हेअर मास्क शेअर केला असून हा मास्क ती २० दिवसांतून एकदा वापरते. पण आपण आपल्या गरजेनुसार वापरु शकतो असेही माधुरी या व्हिडिओमध्ये सांगते. आपणही हा मास्क ट्राय केल्यास आपल्या केसांचा पोत नक्कीच सुधारु शकतो. पाहूयात हा मास्क नेमका कसा तयार करायचा...
१. एक केळं घेऊन बाऊलमध्ये ते चांगले कुस्करुन घ्यायचे. बरेचदा केळं खूप जास्त पिकलेलं असेल तर आपण ते न खाता फेकून देतो, असं केळंही वापरलेलं चांगलं.
२. यामध्ये १ चमचा खोबरेल तेल घालावे. जितके जास्त तेल लावतो तितका जास्त शाम्पू लावावा लागतो. त्यामुळे तेलाचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. मात्र तेलाने केसाच्या मुळांना चांगला मसाज अवश्य करायला हवा.
३. यामध्ये अर्धा चमचा मध घालावा. मध चिकट असल्याने त्याचे प्रमाण कमीच ठेवलेले चांगले. नाहीतर धुताना ते निघणे अवघड होते.
४. हे सगळे चांगले एकजीव केल्यानंतर ते केसांच्या मुळांना न लावता वरचेवर लावायचे.
५. हे सगळे घटक नैसर्गिक असल्याने आणि या मास्कमुळे केसांचा रंग बदलत नसल्याने तो केसांसाठी अतिशय चांगला असतो.
६. याने मुळांना मसाज करण्याची गरज नाही पण मुळांना आणि संपूर्ण केसांना हा मास्क लावू शकतो.
७. साधारण १५ ते २० मिनीटे हा मास्क केसांवर ठेवून नंतर केस स्वच्छ धुवून टाकायला हवेत.
फायदे
१. केळ्यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते, तसेच केसांना पोषण मिळते आणि कंडीशनिंग होते. त्यामध्ये असणारे पोटॅशियम आणि सिलिका हे केसांसाठी सुपरफूड असतात.
२. खोबरेल तेलामुळे केसांमधली कोंडा कमी होतो, केसांचे चांगले पोषण होते. केस भुरकट होण्यापासून संरक्षण होते.
३. मधामुळे केसांना एकप्रकारची चमक येण्यास मदत होते. तसेच केस मुलायम होण्यासही मधाचा उपयोग होतो.