आपले केस चमकदार आणि दाट असावेत असे आपल्याला वाटते जरुर पण ते तसे असतातच असे नाही. प्रदूषण, सततचे ताण, आहाराच्या पद्धती आणि रासायनिक पदार्थ असलेली सौंदर्यप्रसाधने यांमुळे केसांचा पोत खराब होऊन जातो. कधी केस खूप गळतात तर कधी कोरडे होतात. कधी फार पातळ होतात तर कधी काही केल्या केसांची वाढ होत नाही. तुम्हालाही केसांच्या याच समस्या (Hair Care Tips) भेडसावत असतील तर त्यासाठी काही ना काही उपाय करायलाच हवेत ना.
घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले नैसर्गिक हेअरमास्क लावले तर केसांचा खराब झालेला पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. कॉफी आपण सगळेच नियमीत पितो. कॉफी प्यायली की आपल्याला जशी तरतरी येते, त्याचप्रमाणे केसांनाही कॉफी लावली की तरतरी येते. त्यामुळे सध्या बाजारात कॉफीपासून केलेली बरीच सौंदर्यप्रसाधने सर्रास पाहायला मिळतात. पण बाजारातून काही आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार केला तर ते जास्त फायदेशीर ठरु शकते. आता हा हेअरमास्क कसा तयार करायचा आणि कसा लावायचा याविषयी जाणून घेऊया. इन्स्टाग्रामवर ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून यामध्ये हे मास्क कसे तयार करायचे आणि कसे लावायचे याबाबत सांगण्यात आले आहे.
मास्क कसा तयार करायचा
१. एक वाटी दही, दोन ते तीन चमचे कॉफी, २ चमचे ऑलिव्ह ऑईल आणि १ चमचा मध एकत्र फेटून घ्यायचे.
२. ही पेस्ट केसांच्या मुळांना आणि केसांना एकसारखी लावायची.
३. किमान अर्धा तास हा मास्क केसांवर तसाच ठेवून नंतर केस हलक्या शाम्पूने धुवून टाकावेत.
४. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास याचा केसांची वाढ, पोत सुधारण्यास चांगला फायदा होतो.
मास्क लावण्याचे फायदे
१. या मास्कमुळे केसांची मुळे तर मजबूत होतीलच पण केसांचा पोत सुधारण्यासही मदत होईल.
२. या मास्कमुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होऊन केस वाढण्यास मदत होईल.
३. केसांची मुळे डिटॉक्स होऊन केस दाट होण्यासाठी या मास्कचा अतिशय चांगला उपयोग होईल.
४. तसेच कॉफीमुळे केसांना एकप्रकारची शाईन मिळण्यास मदत होईल, केस चमकदार दिसतील.