आपले केस छान दाट आणि लांबसडक दिसावेत असे सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी आपण काही ना काही उपाय सतत करत असतो. यामध्ये ठराविक काही महिन्यांनी केस कापणे आणि त्याचे सेटींग करणे हेही आलेच. आपण पार्लरमध्ये केस कापायला गेलो की हेअर कट झाल्यावर हेअर स्टायलिस्ट ब्लो ड्रायरनी आपले केस सेट करुन देतात. मग केस धुवेपर्यंतच हे सेटींग चांगले राहते, एकदा केस धुतले की मग हे सेटींग जाते. पण ब्लो ड्रायरचा वापर केला तर खराब झालेले केस छान सेट होतात. बाहेर ज्याप्रमाणे ब्लो ड्रायरने आपले केस छान सेट करुन दिले जातात त्याचप्रमाणे आपणही घरच्या घरी ब्लो ड्रायरचा वापर करुन केस चांगल्या पद्धतीने सेट करु शकतो (Hair Care Tips).
आपले केस लहान असतील आणि ते आपल्याला छान फुलवायचे असतील तर ब्लो ड्रायरचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. अनेक जणी घरीही ब्लो ड्रायर वापरतात. पण तो नेमका कसा वापरायचा हे माहित नसल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. ब्लो ड्रायरमुळे केस दाट असल्यासारखे तर वाटतेच पण ते जास्त सिल्की आणि शायनी दिसण्यासही मदत होते. प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ शहनाझ हुसैन ब्लो ड्राय करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगतात. पाहूयात या टिप्स कोणत्या आणि त्याचा कशाप्रकारे उपयोग होतो.
१. केस सेट करण्यासाठी थोडेसे ओलसर करुन घ्या. नंतर ते दोन भागांत विभागून वरती बांधण्यासाठी क्लीप किंवा पीनांचा वापर करा. त्यामुळे एका सेक्शनवर एकावेळी काम करता येईल.
२. डोक्याच्या वरच्या बाजूला असलेले केस ब्रशने थोडे वर करुन घ्या. त्यामुळे केसांचा व्हॉल्यूम जास्त असल्यासारखे वाटेल आणि ते छान बाऊंसी दिसतील. यानंतर तुम्हाला जर बाजूला फ्लिक्स असतील तर ब्रश किंवा कंगव्याचा वापर करुन ते सेट करा.
३. कुरळे केस सरळ करायचे असतील तर ब्रशच्या साह्याने केसांच्या टोकांना रोल करायला हवे. केस सरळच ठेवा पण थोडेसे बाहेरच्या बाजूला फिरवून घ्या. असे केल्याने केस जास्त दाट आहेत असे वाटेल.
४. तुमचा हेअर कट लेअर कट असेल तर दोन्ही बाजूंच्या केसांना उष्णता लागेल असे बघावे. त्यामुळे सगळे केस बाऊंसी होण्यास मदत होते.
५. तुम्हाला जास्त कर्लस हवे असतील तर केसांचे दोन भाग करा आणि छोट्या रोलर्सच्या साह्याने केस बांधून ठेवा. त्यानंतर रोलरचा ड्रायरचा वापर करा.
६. केस फुललेले आणि जाड दिसावेत असे वाटत असेल तर केसांचे चार भाग करा. ४ रोलर्समध्ये हे केस घट्ट बांधून ठेवा. त्यानंतर ते ब्लो ड्रायरचा वापर करुन कोरडे करा.
७. केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर ते ब्रशने स्टाईल करा, त्यामुळे अस्ताव्यस्त झालेले केस एकत्र येण्यास मदत होईल. तसेच केस खराबही होणार नाहीत.