आपले केस मुलायम, चमकदार आणि लांबसडक असावेत अशी आपली इच्छा असते. सिरीयलमधल्या किंवा अगदी बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींप्रमाणे आपले केस छान सिल्की असावेत अशी आपली इच्छा असते. मात्र दैनंदिन आयुष्यात केसांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किंवा रासायनिक उत्पादनांचा अती प्रमाणात वापर, अनुवंशिकता, अन्नातून योग्य ते पोषण न झाल्याने किंवा आणखी काही ना काही कारणांनी केसांचा पोत खराब होतो. रोजच्या व्यवहारात आपण केसांकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता वाढते. अनेकदा केस खूप गळतात, रुक्ष झालेत अशा तक्रारीही आपल्या आजुबाजूला अनेक जणी करत असतात. मात्र असे होऊ नये आणि केस छान मुलायम राहावेत यासाठी कोणत्या ४ चुका आवर्जून टाळायला हव्यात. पाहूयात या गोष्टी कोणत्या (Hair Care Tips)...
१. केस बांधताना
अनेकदा आपण घाईगडबडीत केस घट्ट वरती बांधून टाकतो. घाम येऊ नये म्हणून किंवा केस खूप गळ्यात येऊ नयेत म्हणून आपण ते बांधतो, मात्र हे जर खूप घट्ट बांधले गेले तर त्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना किंवा एरवीही घरात केसांची वेणी घालणे हा उत्तम उपाय ठरतो.
२. केस विंचरताना
अनेकदा आपण साध्या कंगव्याने केस विंचरतो, त्यामुळे ते तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता जास्त असते. मात्र आपले केस कुरळे असतील किंवा जास्त दाट असतील तर ते जाड दाताच्या कंगव्याने विंचरायला हवेत. तसेच प्लास्टीकच्या कंगव्यापेक्षा लाकडाचा कंगवा वापरणे केसांच्या आरोग्यासाठी केव्हाही चांगले. हल्ली बाजारात लाकडी कंगवे अगदी सहज मिळतात, त्यांचा अवश्य वापर करावा.
३. तेलाने मसाज
केसांना नियमितपणे तेलाने मसाज करणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. अनेकदा आपले केस खूप रुक्ष आणि निस्तेज दिसतात. केसांना पुरेसे तेल न मिळाल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना नियमितपणे तेलाने मसाज करावा. हा मसाज करताना तो केसांना न करता केसांच्या मूळांशी करणे आवश्यक असते.
४. इलेक्ट्रीक यंत्रांचा वापर
अनेकदा आपण केस वाळवण्यासाठी किंवा केस सरळ करण्यासाठी विविध यंत्रांचा वापर करतो. यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यायला हवे. ही यंत्र जास्त प्रमाणात वापरणे तितके चांगले नसते. त्यामुळे अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच या यंत्रांचा वापर करावा.