Join us  

Hair Care Tips : उन्हाळ्यात घामामुळे केस खूप चिपचिपे झालेत? ४ उपाय, केस होतील सिल्की आणि शायनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2022 3:49 PM

Hair Care Tips : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पाहूयात असे पदार्थ कोणते आणि ते केसांसाठी कसे वापरायचे

ठळक मुद्देरक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि केसगळती कमी होण्यासाठी मेंथॉल अतिशय उपयुक्त ठरते.  उन्हाळ्यात केस चिपचिपे होतातच पण प्रखर उन्हामुळे कोरडे आणि रखरखीतही होतात.

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे शरीराची लाहीलाही होतेच पण केसांतही घाम येतो. केसांतून वाहणाऱ्या घामाच्या धारा आपल्याला अनेकदा जाणवतात. पण असे झाले म्हणून रोज केस धुणे शक्य नसते. रोजची घरातली कामे, ऑफीसची धावपळ यामध्ये आपण आठवड्यातून दोन वेळा केस धुतो. मात्र उन्हाळ्यात तेही पुरेसे नसते. घाम आल्याने केस चिपचिपीत होतात आणि मग आपण कितीही प्रयत्न केले तरी ते चांगले दिसत नाहीत. इतकेच नाही तर उन्हामुळे केस कोरडे आणि रुक्षही होतात. आपल्या केसांची मुळे चांगली असतील तर आपले केस नकळत चांगले राहतात. त्यामुळे उन्हाळ्यात केस सिल्की आणि शायनी हवे असतील तर केसांची घरच्या घरी काळजी घेता येऊ शकते. (Hair Care Tips) घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पाहूयात असे पदार्थ कोणते आणि ते केसांसाठी कसे वापरायचे...

(Image : Google)

१. कोरफड 

केसांचा पोत सुधारण्यासाठी कोरफड अतिशय चांगली असते. कोरफड ही केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरप्रमाणे काम करते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामामुळे केस चिकट होतात, यामुळे केसांची रंध्रे बंद होतात. या कारणाने केसगळतीचे प्रमाण वाढते. कोरफड़ीचा गर लावल्याने ही रंध्रे उघडण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांचे मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. उन्हामुळे डोक्याच्या त्वचेची आग होत असेल तर ती कमी होण्यासाठीही कोरफडीचा उपयोग होतो.

२. मध 

केसांच्या मूळांची हायड्रेशन लेव्हल चांगली राहण्यासाठी मध हा एक नैसर्गिक घटक असून तो फायदेशीर ठरतो. केसांचे आणि मूळांचे पोषण करण्यासाठी मध फायदेशीर ठरतो. केसांना स्मूद आणि शायनी करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो. मधआमध्ये असणारे अँटीइन्फ्लमेटरी घटक यांमुळे केसांच्या त्वचेची होणारी आग, जळजळ कमी होते. 

३. कडुलिंब 

कडुलिंब आयुर्वेदीक गुणांनी युक्त असलेली वनस्पती आहे. त्वचा, केस यांसाठी कडुलिंबाचे तेल, अर्क अतिशय फायदेशीर असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची देखभाल कऱण्यासाठी कडुलिंबाची पाने हा एक परफेक्ट डिटॉक्सिफाय करणारा घटक ठरतो. केसांत तेलाची जास्त प्रमाणात निर्मिती होत असेल तर कडुलिंब त्यावर अतिशय उत्तम उपाय आहे. 

(Image : Google)

४. मेंथॉल 

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यात कूलींग निर्माण करण्यासाठी मेंथॉल हा घटक उपयुक्त ठरतो. तसेच घामामुळे केसांत वास येत असेल तर तो जाण्यासाठीही मेंथॉल फायदेशीर ठरतो. डोक्यातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि केसगळती कमी होण्यासाठी मेंथॉल अतिशय उपयुक्त ठरते.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी