केस लांब आणि दाट असतील तर आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. पण विविध कारणांनी आपले केस इतके गळतात की कंगवा घातला की मोठाच्या मोठा गुंता बाहेर येतो. इतकेच नाही तर अनेकदा काहीही कारण नसताना केसांची वाढच खुंटते. केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने, ताणतणाव, प्रदूषण, रासायनिक घटकांचा वापर यांसारख्या गोष्टींमुळे केसांच्या विविध समस्या निर्माण होतात. एकदा केसांचा पोत खराब व्हायला सुरुवात झाली की आपल्याला काय करायचं काहीच सुचत नाही. अशावेळी नेमकं काय करायला हवं याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ३ ए चा हा खास फॉर्म्युला त्या आपल्या फॉलोअरर्सना सांगतात (Hair Care Tips).
१. Appreciate - कौतुक करा
आपल्याला नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीचे केस मिळाले आहेत त्याबद्दल खूश राहा. त्या केसांचे आपल्याला कौतुक असायला हवे. ते नसेल तर आपण त्यावर काही ना काही प्रयोग करायला जातो. काही वेळा कुरळे केस सरळ करतो तर कधी सरळ असलेले केस कुरळे करुन घेतो. असे करताना आपल्या केसांना नैसर्गिक पोत खराब होतो. केस गळू नयेत म्हणून त्यांची अतिशय प्रेमाने काळजी घ्या. यासाठी केस धुताना, वाळवताना, विंचरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.
२. Apply - चांगली उत्पादने लावा
आपण केसांना तेल, शाम्पू, कंडीशनर, सिरम, हेअर मास्क असे काही ना काही लावत असतो. मात्र आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार या उत्पादनांची निवड करायला हवी. रासायनिक उत्पादनांपेक्षा घरच्या घरी आयुर्वेदीक उपाय करणं केव्हाही चांगले असते. याचा केसांवर कोणताही साईड इफेक्ट होत नसल्याने हे उपाय करणे जास्त चांगले.
३. Avoid - टाळायलाच हवे
अनेकदा केसांची काही ना काही स्टाईल करण्याच्या नादात आपण त्यांना कलर करतो, डाय करतो. पण यामुळे केस थोड्या काळासाठी चांगले दिसतात, मात्र नंतर त्यांचा पोत खराब होत जातो. त्यामुळे अशाप्रकारच्या फॅशन करणे शक्यतो टाळायला हवे. रोलर, स्ट्रेटनर, आयर्न अशा स्टायलिंग टूल्सचा वापर करणेही केसांसाठी घातक असते. नायलॉन किंवा रफ मटेरीयलच्या उशांचा वापर, कडक उन्हात केस कव्हर न करता बाहेर जाणे, धुम्रपान करणे यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. याबरोबरच आपला आहार, झोप, व्यायाम य़ा जीवनशैलीतील इतर गोष्टींकडेही योग्य पद्धतीने लक्ष द्यायला हवे.