केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग असतात. आपल्या त्वचेचा रंग, पोत, आपल्या चेहऱ्याची ठेवण ही जशी सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते तसेच आपले केस लांबसडक, काळेभोर असणेही तितकेच महत्त्वाचे असते. केस वाढण्यासाठी किंवा केस दाट होण्यासाठी, काळेभोर राहण्यासाठी आणि केसांच्या इतर समस्या कमी होण्यासाठी आपण सतत काही ना काही प्रयोग करत असतो. कधी केसांना वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावून तर कधी शाम्पू आणि कंडीशनरमध्ये बदल करुन आपण केस चांगले राहावेत यासाठी प्रयत्न करतो. इतकेच नाही अनेकदा पार्लरमध्य हेअर स्पा, हेअर मसाज यांसारखे उपचार घेऊन आपण केस चांगले राहावेत यासाठी प्रयत्न करतो. पण यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर आपले केस नैसर्गिकरित्या चांगले राहू शकतात. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणते उपाय करता येतील. केसांची मुळे, त्वचा आणि केस सगळे हेल्दी राहण्यासाठी तज्ज्ञ काही महत्त्वाच्या टिप्स देतात.
१. हेअरमास्क
खोबरेल तेल आणि दही हे दोन्ही घटक केसांसाठी अतिशय चांगले असतात. तुमच्या केसांत कोंडा झाला असेल किंवा केसांच्या मुळांना इतर काही समस्या असतील तर हे इन्फेक्शन दूर होण्यासाठी दही आणि खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांच्या मूळांशी तेल आणि दह्याचे मास्क लावा. त्याचा कोंडा आणि इन्फेक्शन दूर होण्यास चांगला उपयोग होईल.
२. केस विंचरताना काळजी घ्या
अनेकदा आपण घाईघाईत केस जोरजोरात विंचरतो. किंवा काहीवेळी घाई गडबडीत केस विंचरायचा कंटाळा करतो. मात्र अशाने केस तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केस अतिशय हळूवारपणे, चांगल्या प्रतीच्या कंगव्याने विंचरणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी केस मोठे असतील तर केस हळूवारपणे गुंता सोडवत नीट विंचरायला हवेत.
३. केस धुताना लक्षात ठेवा
केस धुताना केस स्वच्छ होणे गरजेचे असले तरी केसांची मुळे आणि त्वचा स्वच्छ होणेही तितकेच गरजेचे असते. त्यामुळे केसांची मुळे आधी स्वच्छ धुवा, त्यानंतर संपूर्ण केस धुवा. केस घसाघसा घासून धुण्यापेक्षा हळूवार धुतल्यास त्याचा पोत चांगला राहण्यास मदत होते. तसेच न विसरता केसांना कंडिशनर, सिरम या गोष्टी लावा. त्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल. सतत केस धुणे आणि खूप दिवस केस न धुणे असे करण्यापेक्षा आठवड्यातून २ वेळा केस धुवा.
४. आहारत ओमेगा ३ चा समावेश आवश्यक
ओमेगा ३ ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट आहे. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे त्वचा, केस आणि एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मासे, चीज, अंडी, जवस, सुकामेवा यांमध्ये ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात असल्याने त्यांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या चांगले राहण्यास मदत होईल.
५. रासायनिक उपचार
सध्या केस स्ट्रेट करणे, कलर करणे, केसांना डाय करणे अशा ट्रीटमेंटस घेण्याचे प्रमाण तरुण वर्गात वाढले आहे. पण या ट्रीटमेंटमुळे केसांचा पोत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांवर एका प्रमाणातच रासायनिक उपचार करायला हवेत.