Join us  

Hair Care Tips : डोकं शांत राहील आणि केसांची वाढही होईल यासाठी वापरावं असं 'एक' तेल, केसांच्या समस्यांवर उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 11:56 AM

Hair Care Tips : केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण केस धुण्याआधी केसांना आवर्जून तेल लावतो. पण केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी तेल कोणते याबाबत...

ठळक मुद्देभृंगराज तेल केस वाढण्यासाठी ज्याप्रमाणे उपयुक्त असते त्याचप्रमाणे केस गळती कमी होण्यासाठीही उपयुक्त असते. जास्त ताण किंवा थकवा आला असेल तर हे तेल उपयुक्त ठरते. 

केस गळणे, पातळ होणे आणि काही वेळा या सगळ्यामुळे टक्कल पडणे अशा समस्या स्त्री-पुरुषांमध्ये सातत्याने उद्भवतात. केस गळणे हे सौंदर्याच्यादृष्टीने चांगले नसले तरी केसांचे योग्य पोषण न झाल्याने ते जास्त प्रमाणात गळतात. आपण झोपतो त्याठिकाणी आपण केस विंचरतो त्या ठिकाणी पुंजक्यानी केस हातात येत असतील तर आपल्या केसांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यायला हवे (Hair Care Tips). प्रदूषण, ताण, आहार, आनुवंशिकता यांसारखी केस गळण्याची अनेक कारणे सांगता येतील. केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण केस धुण्याआधी केसांना आवर्जून तेल लावतो (Hair Oil). दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने धुतो. आता केसांसाठी नेमके कोणते तेल वापरायचे किंवा कोणता शाम्पू केसांसाठी वापरलेला चांगला असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मात्र त्याचे उत्तर आपल्याला मिळतेच असे नाही. तर केसांची वाढ चांगली व्हावी आणि कमीत कमी केस गळावेत यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी राजेंद्र भृंगराज तेल लावण्याचा सल्ला देतात. भृंगराज तेलाने मसाज केल्यास काय फायदे होतात जाणून घेऊया...

(Image : Google)

१. केसांचे पोषण होण्यास उपयुक्त 

आयुर्वेदात भृंगराज तेलाला विशेष महत्त्व आहे. भृंगराज वनस्पतीपासून तयार केलेले तेल असते. केसगळती कमी होण्यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त ठरते. या वनस्पतीमध्ये असणारे पोषक घटक केसांना आणि मुळांना पोषक असतात त्यामुळे केस वाढण्यासाठी या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. या तेलामध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिजे असतात त्यामुळे केस तुटणे, केस कोरडे होणे यांसारख्या समस्यांसाठी भृंगराज तेल अतिशय उपयुक्त असते. 

२. डोकं शांत होण्यासाठी 

अनेकदा आपल्याला विविध प्रकारचे ताण असतात. त्यामुळे डोकं दुखतं किंवा काही वेळा जड होतं. पण भृंगराज तेलाने मसाज केल्यास डोकं हलकं होण्यास मदत होते. इतकेच नाही तर या तेलाने मसाज केल्यावर शांत झोप येण्यास मदत होते. त्यामुळे जास्त ताण किंवा थकवा आला असेल तर हे तेल उपयुक्त ठरते. 

३. कोंडा आणि इतर इन्फेक्शन्ससाठी फायदेशीर

आपल्यापैकी अनेकांना कोंड्याची समस्या असते. पण भृंगराज तेलाचा नियमितपणे वापर केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते. भृंगराजमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने कोंडा कमी होण्यासाठी किंवा इतर इन्फेक्शन्स दूर होण्यासाठी या तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते. 

(Image : Google)

४. केस विरळ होण्यापासून सुटका 

भृंगराज तेलामध्ये असणारे गुणधर्म केस वाढण्यासाठी ज्याप्रमाणे उपयुक्त असतात त्याचप्रमाणे केस गळती कमी होण्यासाठीही उपयुक्त असतात. भृंगराज तेलाने नियमित मसाज केल्यास याठिकाणचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केस गळण्याचे प्रमाण आपोआप कमी होते. त्यामुळे तुमचे केस खूप विरळ झाले असतील किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला टक्कल पडते असे वाटत असेल तर आवर्जून भृंगराज तेल लावायला हवे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी