Join us  

दाट, लांबसडक केसांसाठी न विसरता करा फक्त ५ गोष्टी, दिसाल कायम सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 10:42 AM

Hair Care Tips For Long and Thick Hair : हेअर केअर रुटीनमध्ये नियमितपणे काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

केस लांब-दाट असले की आपल्या सौंदर्यात वेगळीच भर पडते. केस हा स्त्रीचा एक दागिना असून ते जितके दाट-मुलायम असतील तितके छान दिसते. लांब केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईलही करता येत असल्याने आपण फॅशनेबल दिसू शकतो. पण केस लांब आणि दाट नसले की मात्र आपली चिडचिड होते. मग नकळत आपण इतर महिलांच्या केसांशी आपल्या केसांची तुलना करतो. अनुवंशिकता, प्रदूषण, आहारातून मिळणारे पोषण, रासायनिक उत्पादनांचा वापर यांमुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी हेअर केअर रुटीनमध्ये नियमितपणे काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. या गोष्टी कोणत्या आणि त्या कशा फॉलो करायच्या याविषयी समजून घेऊया (Hair Care Tips For Long and Thick Hair)... 

१. केसांना योग्य ते पोषण द्या 

अनेकदा आपण केस चिकट झाले किंवा खराब झाले म्हणून ते धुतो. पण त्याआधी आपण तेल लावायला विसरतो किंवा कंटाळा करतो. असे न करता केस धुण्याच्या २ ते ३ तास आधी न विसरता केसांना तेलाने मसाज करायला हवा. यामध्ये खोबरेल तेल, बदाम तेल असे कोणतेही तेल वापरु शकतो. 

(Image : Google)

२. हेअर पॅक

केसांचे चांगले पोषण व्हावे यासाठी मेहंदी, कोरफड, आवळा पावडर, तांदळाचे पाणी असे विविध घटक वापरुन आपण हेअर पॅक तयार करतो. त्याचप्रमाणे अंडेही केसांना पोषण देण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे केस शायनी आणि लांबसडक व्हावेत यासाठी अंड्याचा निश्चित वापर करावा. आठवड्यातून २ वेळा अंड्याचा वापर केलेला चालतो.

३. आंघोळ करताना 

केस धुताना ते खूप जास्त गरम पाण्याने धुणे टाळावे. कारण पाणी जास्त गरम असेल तर त्यामुळे केसांचा पोत बिघडण्याची शक्यता असते. म्हणून केसांवर पाणी घेताना ते कोमट असावे.

(Image : Google)

४. इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर

आपण अनेकदा केस वाळवण्यासाठी, सेट करण्यासाठी किंवा स्ट्रेटनिंगसाठी विविध प्रकारची इलेक्र्टीक उपकरणे वापरतो. पण या उपकरणांमुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो अशी उपकरणे अगदीच आवश्यकता असेल तेव्हाच वापरावीत.

५. कंडीशनिंग आणि सिरम

केस मुलायम राहण्यासाठी या दोन्हीही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शाम्पू झाल्यावर न विसरता ५ ते १० मिनीटे केसांना कंडीशनर लावून ठेवावे आणि मग पुन्हा केस धुवावेत. याशिवाय केस धुतल्यानंतर ते थोडे ओले असतानाच त्यावर सिरम लावावे. यामुळे केसांचे प्रदूषणापासून रक्षण होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी