पावसाळा आला की आपल्याला एकीकडे घाम येतो आणि काही वेळातच अचानक थंडी वाजायला लागते. पुन्हा थोड्या वेळाने आपण घामाघूम होतो. हवेत होणारा बदल आपल्या शरीरावर परिणाम करत असतो. त्यामुळे आरोग्याबरोबरच त्वचा, केस यांच्या तक्रारीही सुरू होतात. या काळात दमट हवेमुळे केस कधी चिकट तर कधी खूपच कोरडे होतात. यामुळे आपण चंपू दुदिसतो. कधी पावसाने ओले झाल्याने ते खराब दिसतात तर कधी घामाने चंपू दिसतात. अशावेळी आपल्याला कुठे कार्यक्रमाला किंवा अगदी ऑफीसला जायचे असले तर आपल्याला केसांची लाज वाटते (Hair Care Tips For Monsoon).
केस चिकट झाल्याने आपल्याला ते मोकळे सोडता येत नाहीत, बांधून ठेवले तरी ते अतिशय वाईट दिसतात. भर पावसाळ्यातही आपले केस छान सिल्की आणि शायनी असावेत यासाठी काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठीच आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला विनाकारण पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही आणि केसांसाठी महागडी सौंदर्यप्रसाधनेही वापरावी लागणार नाहीत. या टिप्स आणि ट्रिक्स कोणत्या ते पाहूया...
१. केस पावसाने ओले झाल्यावर
पावसाळ्यात शक्यतो भिजू नका, डोकं आणि केस ओले होऊ नयेत यासाठी रेनकोट, छत्री, स्कार्फ यांसारख्या गोष्टींचा वापर करा. मात्र तरीही केस भिजलेच तर ते तसेच सुकवणे योग्य नाही. केस पावसात भिजल्यावर लगेचच पाण्याने किंवा शाम्पूने धुवावेत. नाहीतर केसांचा पोत खराब होतो आणि केस तुटायला लागतात.
२. केस तुटू नयेत म्हणून काय कराल?
पावसाळ्याच्या सिझनमध्ये हवेत एकप्रकारचा ओलावा असतो. ज्यामुळे खूप घाम येतो आणि केस चिपचिपे होतात. अशावेळी केस कोरडे करणे अतिशय गरजेचे असते. केस घामाने किंवा पावसाने ओले झाले असतील तर जड जड वाटते, असे होऊ नये म्हणून केस लगेचच कोरडे करावेत. केस कोरडे करण्यासाठी मऊ-सुती टॉवेलचा उपयोग करायला हवा. तसेच केस ओले असतील तर ते अजिबात बांधून ठेवू नयेत.
३. हेअर वॉश रुटीन
कोणत्याही ऋतूमध्ये केस नियमितपणे धुणे अतिशय गरजेचे असते. पावसाळ्यात घामामुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान ३ वेळा आणि अगदीच जमत नसेल तर २ वेळा तरी केस आवर्जून धुवायला हवेत. तसेच तुम्हाला खूप घाम येत असेल तर अँटी फंगल किंवा अँटी बॅक्टेरीयल शाम्पूचा वापर करावा. तसेच केस धुण्याआधी त्यांना कोमट तेलाने मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होईल आणि केस मजबूत होतील.
४. कोणता कंगवा वापराल
केस विंचरण्यासाठी योग्य प्रकारच्या कंगव्याचा वापर करणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे केस तुटण्यापासून आपण त्याची काळजी घेऊ शकतो. केस ओलसर असतील तर मोठ्या दातांचा कंगवा वापरायला हवा ज्यामुळे केस तुटण्यापासून संरक्षण होईल. तसेच दिवसातून किमान २ ते ३ वेळा केस विंचरायला हवेत.