केसांचे गळणं किती त्रासदायक ठरतं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कारण महिला असो किंवा पुरूष नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पार्लरच्या ट्रिटमेंट,वेगवेगळ्या तेलांचा वापर करून तुम्ही थकला असाल तर एक घरगुती उपाय तुम्हाला नक्की रिजल्ट देईल. कांदा आणि तांदळाचा वापर करून केस गळणं रोखता येऊ शकतं.
कांद्यामुळे केस लांब होतात हे मान्य पण हा कांदा केसांना लावावा कसा? असा प्रश्न पडला असेल तर कांदा केसांना लावायची पध्दत वाचा आणि कांदा केसांना लावून पाहा. कांदा आणि तांदळाचं हे हेअर टॉनिक तयार करण्यासाठी तुम्हाला ३ वस्तूंची गरज असेल.
१ मध्यम आकाराचा कांदा
अर्धा कप तांदूळ
१ ग्लास ताजं पाणी
हेअर टॉनिक असं तयार करा
सगळ्यात आधी कांदा सालं काढून स्वच्छ धुवून कापून घ्या. त्यानंतर तांदूळ धुवून घ्या. नंतर एक पॅन घेऊन त्यात कांदा, तांदूळ आणि एक ग्लास पाणी घाला. मंद आचेवर हे मिश्रण ठेवून द्या. जेव्हा पाणी व्यवस्थित गरम होईल तेव्हा ४ ते ५ मिनिटांसाठी कमी आचेवर शिजू द्या. हे मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या, मध्ये मध्ये ढळवत राहा.
पाणी व्यवस्थित शिजल्यानंतर एका गाळणीच्या मदतीनं भांड्यात गाळून घ्या आणि थंड व्हायला ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा. शॅम्पू करण्याआधी केसांमधील गुंता काढून केसांच्या मुळांवर हे टॉनिक स्प्रे करा. 30 ते 40 मिनिटे केसांवर सोडा आणि नंतर केस कोमट शॅम्पूने धुवा. आपल्या केसांवर टॉनिक लावताना आपल्याला कांद्याचा वास येऊ शकतो परंतु हा वास शॅम्पू केल्यावर निघून जाईल.
जर आपल्याला असे वाटत असेल की वास अजूनही आहे. तर आपण अर्ध्या तासानंतर पुन्हा मोहरीच्या तेलाने मालिश करून केस धुवू शकता. पाणी फिल्टर केल्यावर आपण बाटलीमध्ये केसांचे टॉनिक भरले. पण उरलेल्या तांदूळ आणि कांद्याचे काय? हे मिश्रण फेकण्याची गरज नाही. त्याऐवजी मिक्सरमध्ये बारीक करा आणि केसांचा मास्क बनवा.
कांद्यामध्ये पोटॅशिअम आणि अ, क आणि इ जीवनसत्त्वं असतात याचा फायदा केसांचं पोषण होण्यासाठी होतो. कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं. कांद्यामध्ये असलेल्या अॅण्टिआॅक्सिडण्टमुळे केस लवकर पांढरे होत नाही. आणि केस छान चमकदारही होतात.