Join us  

Hair Care Tips : वर्षानुवर्षे एकच कंगवा वापरताय? केस गळण्याचे महत्वाचे कारण, कंगवा किती दिवसांनी बदलायला हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 2:22 PM

Hair Care Tips : आता हेअर ब्रश किंवा कंगवा किती काळ वापरावा आणि तो कसा साफ ठेवावा याविषयी....

ठळक मुद्दे कंगवा साफ करणे तुलनेने सोपे असते पण हेअर ब्रश साफ करणे काहीसे कठिण असते. डिझायनर कंगवा खरेदी करण्याच्या नादात तो आपल्या केसांसाठी घातक नाही ना याचा विचार करुन मगच खरेदी करावा. 

कंगवा ही आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. केस विंचरण्यासाठी वापरला जाणारा हा कंगवा नसेल तर आपल्या केसांत किती गुंता होईल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यातही आपले केस फार सिल्की नसतील तर ते कितीही वेळा विंचरले तरी त्यात गुंता होतोच (Hair Care Tips) . असे असले तरी दिवसांतून दोन वेळा तरी आपण आवर्जून केस विंचरतोच. केस विंचरल्यामुळे त्यातील गुंता निघत असला तरी आणखी एक फायदा म्हणजे कंगव्यामुळे केसांच्या मूळांचा एकप्रकारे मसाज होतो आणि याठिकाणती रक्ताभिसरण क्रिया सुधारते. आपण दिवसभर बाहरे फिरतो. अनेकदा आपल्याला केसांत घाम येतो. यामुळे केसांत घाण जमा होते. ही घाण केस विंचरताना कंगव्यामध्ये अडकली जाते. अनेकदा आपला कंगवा खराब झाल्याचे आपल्या लक्षात येते. अशावेळी आपण पाण्याने किंवा ब्रशच्या साह्याने कंगवा साफही करतो (Tips to clean your hair brush and comb) . पण काही वेळा घाईत आपले या गोष्टीकड़े अजिबात लक्ष जात नाही आणि वर्षानुवर्षे आपण एकच कंगवा वापरत राहतो. पण असे करणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. आता हेअर ब्रश किंवा कंगवा किती काळ वापरावा आणि तो कसा साफ ठेवावा याविषयी....

(Image : Google)

 वर्षानुवर्षे एकच कंगवा वापरणे हानिकारक 

ज्याप्रमाणे आपण टूथब्रश किंवा इतर गोष्टी ठराविक काळाने बदलतो. त्याचप्रमाणे कंगवाही ठराविक काळाने बदलणे आवश्यक आहे. त्यामध्ये असणारे बॅक्टेरीया केसांसाठी हानिकारक ठरु शकतात. अनेकदा आपण केसांना तेल लावतो, कधी आपल्या केसांत कोंडा असतो, कधी धूळ बसते या सगळ्या गोष्टी कंगव्याणध्ये किंवा हेअरब्रशमध्ये चिकटतात. हाच ब्रश वारंवार वापरत राहणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून ठराविक काळाने कंगवा किंवा ब्रश साफ करायला हवा तसेच जुना टाकून नवीन घ्यायला हवा.  

कंगवा किती दिवसांनी बदलावा

आपण जुने कपडे, चप्पल या गोष्टी ज्याप्रमाण वापरत नाही त्याचप्रमाणे आपण खूप जुना कंगवा सतत वापरत राहणे चांगले नाही. साधारणपणे ६ ते ८ महिन्यांनी आपला कंगवा किंवा हेअर ब्रश बदलणे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे केसांत कोंडा होणे, केस तुटणे, डोक्यात इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे ठराविक काळाने कंगवा बदलणे आवश्यक आहे.

कंगवा खरेदी करताना लक्षात ठेवा

सौंदर्यप्रसाधने किंवा कपडे खरेदी करणे जितके महत्त्वाचे असते. तितकेच आपल्या आरोग्यातील महत्त्वाचा भाग असलेला कंगवा खरेदी करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते. कंगवा खरेदी करताना आपल्या केसांचा पोत, कंगव्याची गुणवत्ता, त्याचे मटेरीयल यांची योग्य पद्धतीने चौकशी करायला हवी. अनेकदा हेअर ब्रशमुळे केस खूप कोरडे होणे, त्यामध्ये केस अडकून तुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कंगवा किंवा ब्रश घेताना योग्य तो विचार करुन मगच खरेदी करावा. फॅशनेबल किंवा डिझायनर कंगवा खरेदी करण्याच्या नादात तो आपल्या केसांसाठी घातक नाही ना याचा विचार करुन मगच खरेदी करावा. 

(Image : Google)

घरच्या घरी असा साफ करा कंगवा आणि ब्रश

आपण ज्याप्रमाणे कपडे, टूथ ब्रश हे धुवून वापरतो त्याचप्रमाणे आपण नियमित केसांसाठी वापरत असलेली कंगवा आणि हेअर ब्रश साफ करणे आवश्यक आहे. गरम पाण्यात बेकींग सोडा घालून त्यामध्ये कंगवा अर्धा तास घालून ठेवा. त्यानंतर एखाद्या ब्रशने त्यातील दातांमधील घाण काढा. त्यानंतर अर्धआ तासासाठी हा ब्रश उन्हात ठेवा. यामुळे त्यातील घाण पूर्णपणे निघण्यास मदत होईल. कंगवा साफ करणे तुलनेने सोपे असते पण हेअर ब्रश साफ करणे काहीसे कठिण असते. शाम्पू आणि विनेगर पाण्यात घालून त्यात हा ब्रश ठेवा. काही वेळाने जुन्या टूथ ब्रशच्या साह्याने यातील घाण साफ करा. त्यानंतर हा ब्रश उन्हात चांगला वाळू द्या, त्यानंतरच तो केसांमध्ये वापरा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीलाइफस्टाइल