आपले केस दाट, लांबसडक असतील तर साहजिकच आपल्या सौंदर्यात भर पडते. पण हेच केस रुक्ष आणि निर्जीव झाले असतील तर मात्र ते अतिशय खराब दिसतात. केसांचा पोत एकदा खराब व्हायला लागला की पुन्हा तो पूर्वपदावर येण्यास बराच काळ जावा लागतो. मग त्यासाठी पार्लरमधल्या महागड्या ट्रिटमेंटस घेण्यापासून ते महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्यापर्यंत असंख्य उपाय करावे लागतात. लांब केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईलही करता येत असल्याने आपण फॅशनेबल दिसू शकतो. पण केस लांब आणि दाट नसले की मात्र आपली चिडचिड होते. मग नकळत आपण इतर महिलांच्या केसांशी आपल्या केसांची तुलना करतो (Hair Care Tips How to Make Hair Mask at Home).
अनुवंशिकता, प्रदूषण, आहारातून मिळणारे पोषण, रासायनिक उत्पादनांचा वापर यांमुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. मात्र हा पोत सुधारण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय करता आले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हेअर मास्क तयार करण्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. या मास्कच्या नियमित वापराने केसांचा पोत तर सुधारेलच पण ते दाट आणि लांब होण्यासही मदत होईल. केस चमकदार झाले की नकळत आपलाही आत्मविश्वास वाढायला मदत होईल. पाहूयात हा हेअर मास्क नेमका कसा तयार करायचा.
१. एका पातेल्यात १ चमचा जवस आणि १ चमचा तांदूळ पाणी घालून काही मिनीटांसाठी चांगले शिजवून घ्यायचे, मग ते थोडे घट्टसर होते.
२. एका सुती कापडात घालून हे मिश्रण चांगले गाळून घ्यायचे. घट्ट असल्याने त्याचा गर कापडातून बाहेर यायला थोडा वेळ लागतो.
३. यामध्ये कोरफडीचा गर किंवा जेल आणि ऑलिव्ह ऑईल किंवा एरंडेल तेल घालावे.
४. बाजारात मिळणाऱ्या व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल घालून हे मिश्रण चांगले एकजीव करावे.
५. हे घट्टसर मिश्रण केसांना लावून ठेवावे, साधारण अर्धा ते पाऊण तासाने केस कोमट पाण्याने आणि शाम्पूने धुवावेत.
६. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास या सगळ्या घटकांचे फायदे केसांना मिळतात आणि केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.