सकाळी आवरताना आणि बाहेर जाताना आपण सगळ्या आधी जे काम करतो ते म्हणजे केस विंचरण्याचे. पण केस विंचरले की कंगव्यात केसांचा मोठा पुंडका आलेला दिसतो. इतकेच नाही तर आपण ज्याठिकाणी उभे आहोत तिथेही भरपूर केस खाली पडलेले दिसतात. अचानक आपले केस खूप गळायला लागले की त्यामागे नेमके काय कारण आहे हे आपल्याला काही केल्या समजत नाही. केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ज्याप्रमाणे चांगला आहार गरजेचा असतो, त्याचप्रमाणे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणेही आवश्यक असते (Hair Care Tips) . आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या केसांकडे दुर्लक्ष झाल्यास केस पांढरे होणे, कोंडा होणे, केस विरळ होणे, रुक्ष होणे आणि केस मोठ्या प्रमाणात गळणे (Hair fall) अशा बऱ्याच समस्या निर्माण होतात. पण केस गळून विरळ होऊ नयेत म्हणून कोणते उपाय करता येतील याविषयी...
१. नियमित तेलाने मसाज
शरीराचे पोषण होण्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम आहाराची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे केसांचे चांगल्या पद्धतीने पोषण व्हावे यासाठी केसांना नियमितपणे तेलाने मसाज करण्याची आवश्यकता असते. आठवड्यातून दोन वेळा केसांना तेलाने मसाज करायला हवा. यामध्ये ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, खोबरेल तेल, कडुलिंबाचे तेल, आवळ्याचे तेल या तेलांचा वापर आपण करु शकतो. हे तेल कोमट करुम केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज केल्यास केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. याबरोबरच केसांनाही हलक्या हाताने थोडे तेल लावावे, म्हणजे केसांचा कोरडेपणा, फाटे फुटणे या समस्या कमी होतात.
२. हलके शाम्पू आणि कंडीशनर
आपण नेहमी घाईगडबडीत केस धुतो खरे. तसेच विविध जाहिरातींना भुलून किंवा आपली मैत्रीम, बहिण कोणता शाम्पू वापरते हे पाहून तोच शाम्पू किंवा कंडिशनर आपण वापरतो. मात्र प्रत्येकाच्या केसांचा पोत वेगळा असतो. त्याप्रमाणे आपल्या केसांना सूट होईल असा कमीत कमी केमिकल्स असणारा शाम्पू आणि कंडीशनर आपण निवडायला हवा. त्यामुळे केस गळण्याची, तुटण्याची समस्या कमी होऊ शकते. आपल्याला कोणता शाम्पू किंवा कंडिशनर वापरायचा हे कळत नसेल तर आपण तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो.
३. नियमित हेअर स्पा करणे
सध्या वाढचे ताण, केमिकल असलेल्या उत्पादनांचा अतिवापर, प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता यांमुळे केसांच्या समस्या वाढल्याचे पाहायला मिळते. पण आपण नियमितपणे हेअर स्पा केल्यास केस मुलायम राहण्यास मदत होते. तसेच केस जास्त प्रमाणात गळत असतील तर त्याचे प्रमाणही नियमित हेअर स्पा केल्याने कमी होऊ शकते. स्पा करण्यासाठी आपल्याला महागड्या पार्लरमध्ये जायची गरज नाही. घरच्या घरी आवळा पावडर, लिंबू, दही, कोरफडीचा गर यांसारख्या गोष्टींचा वापर करुन आपण अगदी छान हेअर स्पा करु शकतो. मात्र महिन्यातून एकदा केसांना वाफ देणे, एखादा हेअर मास्क लावणे यांसारख्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात, त्यामुळे केसगळती कमी होण्यास निश्चित मदत होते.