आपले केस घनदाट, लांबसडक असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. पण काही ना काही कारणानी सतत केस गळणे, पातळ होणे, तुटणे आणि वाढ न होणे यांसारख्या समस्या उद्भवतातच. मग आपण स्वत:वर नाहीतर परिस्थितीवर वैतागतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर घामामुळे केस फारच खराब होऊन जातात. मग वेगवेगळे तेल, शाम्पू किंवा आणखी काही वापरुन केसांचा पोत सुधरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचा फार खास उपयोग होतोच असे नाही. मग केसांचा पोत चांगला व्हावा म्हणून पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटसही घेतल्या जातात. मात्र असे करण्यापेक्षा काही सोपे व्यायामप्रकार केले तर केसांच्या मूळांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि नैसर्गिकरित्या केस वाढण्यास मदत होते(Hair Care Tips). पाहूयात हे योगा प्रकार कोणते आणि ते कशा पद्धतीने केल्याने त्याचा कसा फायदा होतो.
१. अधोमुख श्वानासन
या आसनामध्ये आपण शरीराचा भार हात आणि पायांवर देत असल्याने दंड आणि पाय यांच्यात ताकद यायला मदत होते. तसेच या आसनामुळे फुफ्फुसे मोकळी होऊन श्वासोच्छवास क्रिया अधिक चांगली होऊ शकते. या आसनामुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. डोके खालच्या बाजूला असल्याने डोक्याकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे फॉलिकल्स मजबूत होण्यास मदत होते. हे सगळे केस वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने नियमितपणे हे आसन केल्यास त्याचा फायदा होतो.
२. बालासन
पायाचे घोटे, पार्श्वभाग आणि पाठ यांना ताण देणारे हे आसन आहे. या आसनामध्ये मागच्या बाजूला होऊन डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केला जातो. या आसनामुळे डोक्यातील ताण दूर होण्यास मदत होते. या आसनामुळे आपली मज्जासंस्था नवनिर्मितीच्या दृष्टीने काम करते. त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो केसांच्या वाढीस याचा चांगला उपयोग होतो.
३. कपालभाती
हा प्राणायमामधील एक उत्तम असा प्रकार आहे. एका ठराविक लयीत श्वासोच्छवास क्रिया केल्याने शरीरातील अनावश्यक वायू बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच कपालभातीमुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे एकूण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांची वाढ होण्यास याची चांगली मदत होते.
४. शिर्षासन
या आसनामुळे शरीर. मन शांत होण्यास मदत होते. सगळे योगा प्रकार केल्यावर सर्वात शेवटी ही क्रिया केली जाते. डोक्यावर शरीराचा सर्व भार घेऊन केल्या जाणाऱ्या या क्रियेसाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. मेंदूच्या आणि डोक्याच्या दिशेने शरीराचा रक्तप्रवाह होत असल्याने ही क्रिया नियमित केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते.