Join us  

Hair Care Tips : कितीही काळजी घेतली तरी केस गळतात, तुटतातच; ५ उपाय केस राहतील कायम दाट आणि लांबसडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2022 12:39 PM

Hair Care Tips : काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास आपले केसही दाट आणि लांबसडक होऊ शकतात. त्यासाठी काय करायचे पाहूया...

ठळक मुद्देउशीच्या कव्हरचे आणि केसांचे घर्षण होऊन केसांचा पोत खराब होऊ शकतो. त्यामुळे उशी निवडताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी. हेअरस्टाइल करत असताना केस खराब होणार नाहीत ना याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

आपण केसांची कितीही चांगली काळजी घेतली तरी केस सतत गळतातच. काही वेळा केसं विंचरताना किंवा बांधताना तुटतातही. कधी केसांत खूप कोंडा होतो तर कधी ते पांढरे होतात. मात्र या सगळ्याचा आपल्या सौंदर्यावर फरक पडत असल्याने आपण केसांच्या समस्यांना वैतागतो (Hair Care Tips). मात्र केसांतून कंगवा फिरवला की जमिनीवर केसांचा मोठा गुंतोळा पडत असेल आणि हात घातला की केस तुटून बाहेर येत असतील तर आपल्याला त्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेल्सप्रमाणे सिल्की, शायनी आणि दाट केस हवे असतील तर त्यासाठी फक्त पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट आणि महागडी उत्पादने गरजेची नसतात. तर काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास आपले केसही दाट आणि लांबसडक होऊ शकतात. त्यासाठी काय करायचे पाहूया...

(Image : Google)

१. ठराविक काळाने केस कापणे 

ठराविक काळाने केस कापल्यास केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होते. केस जसे वाढत जातात तसे केसांच्या खालच्या बाजूला ते रुक्ष आणि निर्जीव होत जातात. मात्र दर दिड ते २ महिन्यांनी केस खालच्या बाजुने ट्रीम केल्यास त्यांचा पोत चांगला राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर आपल्या आवडीचा एखादा छानसा हेअरकट केल्यास आपला लूक बदलण्यासही त्याची चांगली मदत होते. 

२. चांगली उत्पादने वापरणे 

आपल्या केसांचा पोत, आपण राहत असलेले ठिकाण, पाण्याचा प्रकार यांनुसार केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची निवड करायला हवी. यामध्ये तेल, शाम्पू, कंडीशनर, सीरम, हेअर पॅक अशा सगळ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या केसांनी सूट होतील अशी उत्पादने निवडल्यास केस गळणे आणि तुटणे नियंत्रणात राहते. 

३. केस रोजच्या रोज धुवावेत का

अनेकदा आपल्या केसांत तेलाची निर्मिती होते. इतकेच नाही तर प्रदुषणामुळे केसांवर बसणाऱ्या धुळीमुळे केस खराब होतात. त्यामुळे केस चिकट आणि खराब होण्याची शक्यता असते. धुतल्यानंतर केस छान शायनी दिसतात त्यामुळे आपल्यातील अनेक जण सारखे केस धुतात. पण सतत शाम्पू आणि रासायनिक घटक असलेली उत्पादने वापरल्याने केस खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुतलेले चांगले. 

(Image : Google)

४. हेअरस्टाइल 

सतत केस कुरळे करणे किंवा सरळ करणे. केसांसाठी वेगवेगळी उत्पादने वापरत राहणे यांमुळे केसांचा पोत खराब होतो. याशिवाय सतत केस मोकळे सोडणे, सतत वरच्या बाजूला बांधून ठेवणे यांमुळेही केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हेअरस्टाइल करत असताना केस खराब होणार नाहीत ना याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. अन्यथा त्यामुळेही केस गळण्याचे आणि तुटण्याच्या प्रमाणात वाढ होते. 

५. उशीची निवड 

आपल्या केसांची काळजी घेताना आपण इतर सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो पण उशीची निवड कशी करावी याबाबत मात्र आपल्याला माहित नसते. मऊ, सिल्कची उशी निवडणे केस चांगले राहण्यासाठी गरजेचे असते. उशीच्या कव्हरचे आणि केसांचे घर्षण होऊन केसांचा पोत खराब होऊ शकतो. त्यामुळे उशी निवडताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी