Join us  

Hair care Tips : काहीही केलं तरी केस वाढतच नाहीत? ४ घरगुती उपाय, एक महिन्यात पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 3:57 PM

Hair care Tips : आपले केस अभिनेत्रींप्रमाणे लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. आता असे केस वेगाने वाढावेत यासाठी काही सोपे, घरगुती उपाय

ठळक मुद्दे केसांच्या मुळांना कोरफडीची जेल रात्रभर लावून ठेवा. सकाळी उठल्यावर केस धुवून टाका. कांदे चिरुन त्याचा मिक्सरवर रस करणं सोपं असल्यानी आणि कांदे घरात सहज उपलब्ध असल्याने हा अगदी सोपा उपाय आहे.

आपण नियमितपणे केसांना तेलाने मसाज करतो, शाम्पू आणि कंडिशनर लावून धुतो. ठराविक महिने झाले की केस कापतो. मधेआधे हेअर स्पा, घरच्या घरी एखादा हेअर मास्क लावणे किंवा आणखी काही घरगुती उपाय करतो (Hair care tips) . पण काही केले तरी आपले केस वाढतच नाहीत. आपल्या आजुबाजूच्या मुलींचे केस कितीदा कापले तरी भराभर वाढतात आणि आपले मात्र का वाढत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडतो. केस वाढण्यासाठी (hair growth) बाह्य उपचारांबरोबरच आहार, झोप, ताणतणाव, अनुवंशिकता यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तरीही आपले केस अभिनेत्रींप्रमाणे लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. आता असे केस वेगाने वाढावेत यासाठी काही सोपे, घरगुती उपाय पाहूया (Home remedies) , हे उपाय केल्यास तुम्हाला महिन्याभरात बदल दिसून येईल. 

(Image : Google)

१. तीळाचे तेल आणि मेथ्या

हे दोन्ही घटक आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. आरोग्यासाठी ज्याप्रमाणे मेथ्या आणि तीळ चांगले असतात त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठीही त्याचा चांगला फायदा होतो. मेथ्या थोड्या भाजून त्याची पावडर करुन घ्या. यामध्ये पावडर भिजेल इतके तिळाचे तेल घाला. हे मिश्रण केसांच्या मूळांशी लावा. सगळीकडे हे मिश्रण चांगले चोळून लावा. अर्धा तास केस तसेच ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास केसांच्या मूळांना पोषण मिळेल आणि केस वाढण्यास मदत होईल. 

२. कोरफड जेल

कोरफड आपली त्वचा, केस यांच्यासाठी चांगली असते हे आपल्याला माहित असते. पण केसांच्या वाढीसाठी तिचा नेमका कसा उपयोग करायचा याबाबत आपल्याला माहित असेलच असे नाही. आपले केस लांबसडक व्हावेत असे वाटत असेल तर केसांच्या मुळांना कोरफडीची जेल रात्रभर लावून ठेवा. सकाळी उठल्यावर केस धुवून टाका. यामुळे केसांची वाढ चांगली होईल. आठवड्यातून ३ वेळा हा प्रयोग केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल. तुम्हाला रात्री झोपताना हे नको वाटत असेल तर केस धुण्याच्या २ तास आधीही तुम्ही जेल लावू शकता. 

३. आवळ्याचा रस 

आवळा हे फळही आरोग्याप्रमाणेच केसांसाठी अतिशय फायदेशीर असते. आवळ्याचे तेल, आवळ्याचा शाम्पू, आवळा पावडर अशा अनेक गोष्टींचा वापर आपण केसांच्या सौंदर्यासाठी केल्याचे ऐकत असतो. त्याचप्रमाणे लावायला सोपा असलेला आवळ्याचा रस केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या आवळ्याचा रस केसांना लावल्यास केस घनदाट होण्यास मदत होते. आवळ्याचा रस केसांना लावून अर्धा ते पाऊण तास ठेवायचा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून टाकायचे. असे सलग एक ते दोन महिने केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. 

(Image : Google)

४. कांद्याचा रस 

कांद्यामध्ये असणारे सल्फर केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगले असते. मात्र कांद्याच्या रसाने केस कोरडे होण्याचीही शक्यता असते. पण केस कोरडे होऊ नयेत यासाठी कलौंजीचं तेल तुम्ही यामध्ये घालू शकता. कांदे चिरुन त्याचा मिक्सरवर रस करणं सोपं असल्यानी आणि कांदे घरात सहज उपलब्ध असल्याने हा अगदी सोपा उपाय आहे. यामुळे वाढ कमी झालेले केस वेगाने वाढण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी