Join us  

Hair Care Tips : काहीही केलं तरी केस विरळच दिसतात? केस दाट-जाड दिसण्यासाठी ४ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 2:23 PM

Hair Care Tips : काहीही केले तरी अनेकदा केस पातळ आणि विरळच दिसतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर पाहूयात केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसण्यासाठी काही सोपे उपाय...

ठळक मुद्देकेसांना मॉईश्चर मिळण्यास मदत होईल. हा टॉवेल जवळपास अर्धा तास बांधून ठेवावा आणि त्यानंतर केसांना शाम्पू करावा.आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा केस शाम्पूने धुणे योग्य आहे. पण रोज धुवू नयेत.

आपल्यापैकी प्रत्येकाला आपले केस दाट, जाड असावेत असे वाटते. पण काहीही केलं तरी आपले केस विरळ आणि पातळच दिसतात. वेगवेगळ्या तेलांचा, शाम्पूचा वापर करुन तर कधी वेगवेगळे हेअरमास्क वापरुन आपण केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसावा यासाठी प्रयत्न करतो. याशिवायही कधी घरगुती हेअरमास्क लावून तर कधी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस करुन आपण केस लांब, दाट होण्यासाठी प्रयत्न करतो (Hair Care Tips) . पण तरीही अनेकदा केस पातळ आणि विरळच दिसतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर पाहूयात केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसण्यासाठी काही सोपे उपाय...

(Image : Google)

१. केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसेल असा शाम्पू वापरा

तुम्ही नियमीतपणे जो शाम्पू वापरता तो शाम्पू तुमच्या केसांसाठी चांगला असेलही कदाचित. पण त्यामुळे तुमचे केस छान फुगलेले दिसतीलच असे नाही. त्यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसावा यासाठी तुम्ही नेहमीपेक्षा वेगळा शाम्पू वापरुन बघा. ज्या शाम्पूमध्ये चांगले क्लिंझिंग एजंट आणि बायोटीन यांचे प्रमाण योग्य असेल असा शाम्पू तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढण्यास उपयुक्त असतो. त्यामुळे असा शाम्पू शोधा आणि तोच वापरा.

२. केस उलटे करुन ब्लो ड्राय करा

केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी तुम्ही नेहमीसारखी पद्धत वापरली तर तुमचे केस बाऊन्सी होणार नाहीत. पण हेच केस तुम्ही उलटे केले आण ब्लो ड्राय केले तर केसांचा व्हॉल्यूम आहे त्यापेक्षा जास्त दिसायला मदत होईल. यासाठी तुम्हाला डोके खाली करुन केस चेहऱ्यावर उलटे घेऊन मग ब्लो ड्राय करावे लागेल. एकदा याची टेक्निक लक्षात आली की तुम्ही घरच्या घरी हे ब्लो ड्राय अगदी सहज करु शकाल. केस दाट आणि जाड दिसण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. 

३. रोजच्या रोज शाम्पू वापरु नका 

रोजच्या रोज शाम्पू केल्याने आपले केस चांगले राहतील असे अनेकांना वाटते. पण शाम्पूमुळे केस खराब होण्याची आणि गळण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या रोज तुम्ही केसांना शाम्पू करत असाल तर तसे अजिबात करु नका. त्यामुळे केस खराब होतील. आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा केस शाम्पूने धुणे योग्य आहे. तसेच केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसावा असे वाटत असेल तर कोरडे शाम्पू वापरा. आपल्या शाम्पूमध्ये केस सिल्की होण्यासाठीचे घटक जास्त असतील तर त्याचा केस झुपकेदार दिसायला उपयोग होत नाही. 

(Image : Google)

४. हॉट टॉवेल थेरपी 

शरीराला ज्याप्रमाणे मॉईश्चरची आवश्यकता असते त्याचप्रमाणे केसांच्या मूळांनाही मॉईश्चर मिळणे गरजेचे असते. आपण केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसावा यासाठी ब्लो ड्राय किंवा कोरडे शाम्पू वापरत असू तर केस कोरडे किंवा खराब होण्याची शक्यता असते. पण तुम्ही तेलाने केसांना मसाज केल्यानंतरते मूळांमध्ये मुरावे यासाटी हॉट टॉवेल थेरपीचा उपयोग करायला हवा. तेलाने मसाज केल्यानंतर टॉवेल कडक पाण्यात बुडवून तो पिळून केसांना बांधून ठेवावा. त्यामुळे केसांना मॉईश्चर मिळण्यास मदत होईल. हा टॉवेल जवळपास अर्धा तास बांधून ठेवावा आणि त्यानंतर केसांना शाम्पू करावा. यामुळे केसांचा पोत सुधारतो आणि केस दाट आणि जाड दिसायला लागतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी