केसांच्या वाढीसाठी, केस जास्त गळू नयेत म्हणून आणि केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळावे यासाठी आपण त्यांना तेलाने मसाज करतो. बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात.महागड्या शाम्पूप्रमाणे महागडे तेल वापरले की आपल्या केसांच्या समस्या दूर होतील असे अनेकींना वाटते. हे जरी काही प्रमाणात खरे असले तरी केसांमध्ये मॉईश्चर टिकून ठेवण्यासाठी तेल लावताना ते कधी लावायचं हेही तितकच महत्त्वाचं आहे. केसांना तेल लावताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात, त्याविषयी (Hair Care Tips Oil Massage Tips for Better Hair)...
१. पिंपल्स आले असतील तर
तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आले असतील तर तेल लावणे शक्यतो टाळायला हवे. काही वेळा आपण डोक्याला लावलेले तेल चेहऱ्यावर येते आणि या कपाळावरील किंवा गालावरील फोडांमध्ये जमा होते. यामुळे चेहरा जास्त खराब होण्याची शक्यता असते. पिंपल्स दूर ठेवण्यासाठी केस स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते.
२. कोंडा असल्यास
केसांत कोंडा झाला असेल आणि तो दूर करायचा असेल तर केसांना तेल लावणे टाळा. कोंडा असेल आणि त्यावर तेल लावल्यास कोंडा वाढण्याची शक्यता असते किंवा तेलामुळे कोंडा आहे तसाच राहतो. म्हणून कोंडा असताना तेल लावू नका.
३. तेलकट त्वचा
तुमची डोक्याची त्वचा तेलकट असेल तर तेल लावणे शक्यतो टाळा. कारण तेलामुळे ही त्वचा आहे त्यापेक्षा जास्त ऑयली होते आणि एकूणच केसांचे आरोग्य खराब होते.
४. फोड असल्यास
काहींना घामामुळे किंवा अन्य काही इन्फेक्शन्समुळे डोक्यामध्ये फोड असण्याची शक्यता असते. अशावेळी तेल लावणे शक्यतो टाळावे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेलामुळे फोड पसरण्याची आणि वाढण्याची शक्यता असते.
५. केस धुतल्यनंतर
केस धुण्याच्या आधी शक्यतो केसांना तेल लावावे. केस धुतल्यावर तेल लावल्यास केस चिपचिपे तर दिसतातच पण त्यामुळे केसांवर धूळ किंवा इतर घाण बसून केसांचा पोत खराब होतो