पदार्थ अधिक चविष्ट करण्यात कांदा जसा उपयुक्त ठरतो, तसेच तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीही कांद्याचा उपयोग होतो. कांद्यामध्ये व्हिटामिन ए, सी, ई (vitamin A, C, E), झिंक (zinc), लोह (iron) तसेच इतरही अनेक जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स आहेत. कांद्याच्या सालांमध्ये अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे सगळे आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. एवढेच नाही तर कांद्याचा उपयोग आपल्या केसांचा मुळ रंग कायम ठेवण्यासाठीही होतो. त्यामुळे केसांचे पांढरे होणे रोखायचे असेल, तर कांद्याचा असा उपयोग करा.
१. कांद्याची सालं आणि चहा पावडर
Onion and Tea powder
कांद्याची सालं एक वाटी आणि दोन टेबलस्पून चहा पावडर दोन ग्लास पाण्यात घालून उकळा. हे पाणी उकळून निम्मे करा. पाणी कोमट झाल्यावर ते तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. केस धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करा. हा उपाय नियमितपणे केला तर केसांचे पांढरे होणे थांबते तसेच केसांची वाढ देखील चांगली होते.
२. कांदा आणि कोरफडीचे तेल
Onion and Aloe vera
कांदा आणि कोरफडीचा एकत्रित वापर केसांसाठी फायदेशीर ठरतो. एका पातेल्यात अर्धा लीटर नारळाचे तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये दोन टेबलस्पून कोरफडीचा गर टाका आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाका. तेलात टाकलेला कांदा कोरडा पडून कडक होईपर्यंत तेल उकळू द्या. त्यानंतर तेल कोमट झाले की ते गाळून घ्या. हे तेल आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना केसांच्या मुळाशी लावा. दुसऱ्या दिवशी शाम्पू करून केस धुवून टाका. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि इतर केस पांढरे होणार नाहीत.
३. कांदा आणि आवळा
Onion and Aamla
केसांना निरोगी ठेवण्यासाठी हे दोन्ही घटक अतिशय उपयुक्त आहेत. हे दोन्ही घटक वापरून तयार केलेलं तेल केसांसाठी उपयुक्त आहे. यासाठी अर्धा लीटर नारळाचं तेल एका पातेल्यात गरम करायला ठेवा. त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाका. तसेच पाच मध्यम आकाराचे आवळेही बारीक चिरुन टाका. कांद्यातला सगळा ओलसरपणा निघून तो कडक होईपर्यंत तेल उकळू द्या. त्यानंतर तेल कोमट झाले की ते गाळून घ्या. हे तेल केसांच्या मुळाशी हळूवार हाताने लावा. दोन तासांनी केस शाम्पू वापरून धुवून टाका. आवळा आणि कांदा या दोन्हींच्या एकत्रित उपयोगामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत.