केस लांबसडक आणि घनदाट असतील की आपल्या सौंदर्यात भर पडते. स्त्रियांच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणून केसांना जपले जाते. पण काही केल्या अनेकदा आपले केस वाढत नाहीत. सतत केमिकल्सचा मारा करुनही केसांचा पोत बिघडतो (Hair Care Tips) तर अन्नातून पुरेसे पोषण होत नसल्याने केसांची वाढ खुंटते. मग महागडे पार्लरचे उपचार केले जातात. पण त्याचा म्हणावा तसा आणि दिर्घकाळासाठी उपयोग होतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा सौंदर्यासाठी उपयोग करता आला तर? भारतीय स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी या आरोग्याबरोबरच आपली त्वचा, केस यांच्यासाठीही उपयुक्त असतात. आयुर्वेदातही या गोष्टींचे बरेच महत्त्व सांगितले जाते. मसाल्याचे पदार्थ ही तर भारतीयाच्या किचनमधली खास गोष्ट. या मसाल्याच्या पदार्थांमधील काळी मिरी ही आरोग्यासाठी जितकी लाभदायक असते तितकीच ती केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असते. काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कोरोनाईड, फ्लेवोनाईडस, फोलिक अॅसिड, पोटॅशियम आणि इतरही अनेक गुणधर्म असतात. या सर्व गुणधर्मांमुळे केस दाट होण्यास मदत होते. या घटकांमुळे केस वाढण्यास (Hair Growth) मदत होते आणि केसांतील कोंडाही दूर होतो. पाहूयात काळी मिरी कशी वापरायची...
१. केसांची मुळे एक्सफॉलिएट करा
अनेकदा प्रदूषण, धूळ, घाम किंवा तेल यांमुळे केसांची मुळे बंद होतात आणि त्यांना हवा किंवा ऑक्सिजन मिळत नाही. अशाप्रकारे मूळांना पोषण न मिळाल्याने केसांची वाढ खुंटते. काळी मिरी ओबडधोबड बारीक करुन घ्या. त्यामध्ये कोरफडीचा गर घाला आणि या मिश्रणाने केसांच्या मूळांना चांगला मसाज करा. यामुळे मुळांशी अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. १५ ते २० मिनीटे हे मिश्रण केसांना तसेच ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. यामुळे डोक्यातील त्वचेची रंध्रे मोकळा श्वास घेऊ शकतील आणि केसांची चांगली वाढ होईल.
२. काळ्या मिरीचे तेल तयार करा
आपण नेहमी केसांना वेगवेगळ्या तेलाने मसाज करतो पण त्याचा कितपत उपयोग होतो माहित नाही. केसांच्या पोषणासाठी आणि चांगली वाढ होण्यासाठी तेलाने मसाज करणे उपयुक्त असते. काळी मिरीचे तेल घरच्या घरी तयार करुन ते केसांना लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. २ चमचे मेथीचे दाणे, १ चमचा काळी मीरी, २० कडीपत्त्याची पाने, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल. सुरुवातीला कढईमध्ये काळी मिरी, मेथीचे दाणे आणि कडिपत्ता चांगला परतून घ्या. त्यानंतर एका ताटलीमध्ये हे सगळे काढून गार होऊद्या. मिक्सरमध्ये बारीक पावडर करुन घ्या. कढईत तेल कोमट करुन त्यामध्ये ही पावडर घाला. एकजीव होईपर्यंत गॅस बारीक सुरू ठेवा नंतर बंद करुन हे तेल गार होऊद्या. गार झालेले तेल गाळणीने गाळून केसांच्या मूळांशी लावा.
३. आठवड्यातून किती वेळा कराल तेलाने मसाज
घरच्या घरी तयार केलेले हे काळ्या मिरीच्या तेलाने केसांना चांगला मसाज करा. तुम्हाला लवकरात लवकर केस वाढलेले हवे असतील तर आठवड्यातून किमान २ वेळा या तेलाने मसाज करायला हवा. तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर हे तेल रात्रभर लावून ठेवू नका. केस धुण्याच्या २ तास आधी लावा. नाहीतर उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची किंवा त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.