आपले केस लांबसडक आणि शायनी, मुलायम असावेत असे प्रत्येकालाच वाटते. पण कधी प्रदूषणामुळे तर कधी शरीराच योग्य पद्धतीने पोषण होत नसल्याने केस खराब होतात. केसांचे पोषण व्हावे म्हणून आपण त्यांना तेलाने मसाज करतो. यातही खोबरेल तेलाने केसांचे चांगले पोषण होते म्हणून आपण आवर्जून चांगल्या प्रतीचे खोबरेल तेल वापरतो. तेल लावल्याने केस मुलायम होतील असे आपल्याला वाटते पण तसे न होता केसांचा पोत आहे तसाच राहतो (Hair Care Tips). याचे कारण म्हणजे आपण खोबरेल तेल केसांना लावताना काही चुका करतो. त्यामुळे केसांच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी खोबरेल तेल लावताना कोणती काळजी घ्यायची याविषयी समजून घेणे आवश्यक आहे (How To Apply Coconut Oil to hairs). पाहूयात खोबरेल तेल लावण्याच्या टिप्स...
१. कोरड्या केसांसाठी
केस कोरडे असले की ते खूप भुरे दिसतात. असे केस जास्त प्रमाणात फुगत असल्याने ते मुलायम न दिसता रखरखीत दिसतात. मात्र या केसांमध्ये मॉईश्चर टिकून ठेवण्यासाठी खालील मास्क करुन तो केसांना लावावा. त्यामुळे कोरडे केसही मुलायम होतात. १ अंडे, १ चमचा मध आणि २ चमचे प्युअर खोबरेल तेल एकत्र करावे. केसांचे दोन भाग करुन केसांच्या मुळापासून टोकापर्यंत हे मास्क सगळीकडे लावावे. त्यानंतर केस ३० मिनीटांसाठी शॉवर कॅप, एखादे सुती कापड किंवा जुना टिशर्ट याने बांधून ठेवा. त्यानंतर तुम्ही नियमितपणे जो शाम्पू वापरता त्याने केस स्वच्छ धुवा. अंडे आणि मध असल्याने एका धुण्यात केस स्वच्छ होणार नाहीत. त्यामुळे केस स्वच्छ होण्यासाठी दोन ते तीन वेळा शाम्पूने धुवा.
२. निर्जीव केसांसाठी
२ चमचे खोबरेल तेल आणि १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एकत्र करा. खोबरेल तेल घट्ट असेल तर ते गरम करुन पातळ करुन घ्या मगच व्हिनेगर मिक्स करा. हे मिश्रण गार झाल्यावर निर्जीव झालेल्या केसांना एकसारखे लावा. केसांच्या मूळांपासून ते टोकापर्यंत हे मिश्रण योग्य पद्धतीने लावून केस १५ ते २० मिनीटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर केस शाम्पू आणि कंडीशनरने स्वच्छ धुवा. यामुळे निर्जीव झालेल्या केसांमध्ये जान येण्यास मदत होईल.
३. खोबरेल तेल लावल्यावर हे नक्की लक्षात ठेवा
आपण नेहमी केसांना खोबरेल तेल लावतो आणि रात्रभर ठेवून सकाळी केस शाम्पूने धुवून टाकतो. पण असे करताना खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. त्यामुळे ते केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. तसेच तेल लावल्यानंतर केसांना चांगले मॉईश्चर मिळावे यासाठी डोक्याला एखादे सुती कापड किंवा जुना टॉवेल बांधून ठेवावे. साधारण ७ ते ८ तास रात्रभर केस असे ठेवल्यानंतर ते सकाळी शाम्पू आणि कंडिशनरने धुवावेत. यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.