कढीपत्ता म्हणजे फोडणीत घातल्यावर पदार्थाचा स्वाद वाढवणारा पदार्थ. इतकेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतकेच नाही तर कढीपत्ता सौंदर्याच्यादृष्टीनेही अतिशय उपयुक्त असतो. एकदा आपले केस गळायला लागले की ते थांबण्यासाठी काय करावे हे आपल्याला अनेकदा कळत नाही. इतकेच नाही तर केसांचा कोरडेपणा, कोंडा, पांढरे होणे अशा एक ना अनेक समस्या आपल्याला वारंवार भेडसावत असतात. त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते ते वेगळेच. यावर महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक उपचार करणे केव्हाही फायद्याचे ठरते. कढीपत्त्यामध्ये असणारे अमिनो अॅसिड केसांतील फायबरची मात्रा वाढवते आणि केसांना गळण्यापासून वाचवते. केसांच्या मुळांशी असणारी रंध्रे ओपन झाल्याने केसांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळण्यास याची मदत होते आणि केसांची वाढ चांगली होते.
कढीपत्त्याचा कसा उपयोग होतो...
दररोज प्रत्येक व्यक्तीचे ५० ते ७० केस गळणे अतिशय सामान्य आहे. कारण नवीन केसांच्या निर्मितीसाठी त्याची आवश्यकता असते. मात्र याहून जास्त प्रमाणात केस गळत असतील तर ते चिंतेचे कारण होऊ शकते. कढीपत्त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस केसांच्या मूळांना मजबुती देण्याचे काम करतात, त्यामुळे केसगळतीची समस्या नियंत्रणात येते. कढीपत्त्यामुळे केसांना एकप्रकारे मॉईश्चरायझर मिळते आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. केस वाढण्याबरोबरच आहेत त्या केसांना बळकट करण्याचेही काम कढीपत्त्याद्वारे केले जाते. प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि बीटा केरोटीन या घटकांचा केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे केसांना चमक येण्यासही मदत होते.
कढीपत्त्यापासून तेल कसे करायचे?
एका छोट्या कढईमध्ये किंवा मायक्रोव्हेवमध्ये खोबरेल तेल गरम करायचे. त्यानंतर त्यामध्ये १२ ते १५ कढीपत्त्याची पाने घालायची. कढीपत्त्याच्या कडा काळ्या होणार नाहीत तोपर्यंत ती पाने गरम होऊ द्यायची. मग गॅस बंद करुन तेल गरम होण्याची वाट बघायची. तेल गार झाल्यावर बोटांच्या कडांनी स्काल्पला चांगला मसाज करायचा. रात्रभर हे तेल लावून झोपायचे. सकाळी हलक्या शाम्पूने केस धुवायचे. केस मजबूत होण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा.