केसांना काहीही केलं तरी ते छाम मुलायम, लांबसडक, घनदाट नाहीत अशी तक्रार आपल्य़ातील अनेक जणी वारंवार करताना दिसतात (hair care tips). इतकंच नाही तर केस सतत गळतात, कोंडा होतो, कोरडे होतात अशा तक्रारीही अनेकींना भेडसावत असतात. मग त्यासाठी एकतर भरमसाठ रासायनिक उत्पादने वापरली जातात, नाहीतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस (hair care treatments) केल्या जातात. केस आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग असल्याने आपण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो. पण या उपायांनी केसांचा पोत सुधारतोय असे वाटत नसेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या स्टेप्सनी हेअर स्पा (Hair spa) करु शकतो. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते, इतकेच नाही तर केसांचा पोतही सुधारण्यास मदत होते. पाहूया घरच्या घरी हेअर स्पा (how to do hair spa at home) करण्याच्या सोप्या स्टेप्स...
१.तेलाने मसाज
केसांना तेलाने मसाज करणे ही हेअर स्पा मधील सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे. तेलामुळे केसांचे चांगले पोषण होत असल्याने केसांच्या मुळांना तेलाने मसाज करावा. खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल यांचा या मसाजसाठी आपण वापर करु शकतो. हे तेल थोडे कोमट करुन मग केसांना लावावे, मूळांना मसाज केल्याने याठिकाणचा रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
२. केसांना वाफ द्या
आता केसांना वाफ कशी द्यायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टर्कीसचा टॉवेल एकदम गरम पाण्यात बुडवायचा. तो घट्ट पिळून त्यातले पाणी काढून टाकायचे. आणि हा गरम टॉवेल केसांना बांधून ठेवायचा. या टॉवेलमधली गरम वाफ केसांना मिळाल्याने तेल केसांमध्ये मुरते, त्यामुळे केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते.
३. शाम्पू करा
केस धुण्यासाठी आपण नेहमीच गरम पाण्याचा वापर करतो पण त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना गरम पाण्याऐवजी गार किंवा कोमट पाण्याने धुवायला हवे. तुमच्या केसांना सूट होईल असा हलका शाम्पू वापरा. त्यामुळे केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होईल.
४. हेअर मास्क
हा हेअर स्पा मधील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हेअर मास्कमुळे केसांचे आरोग्य सुधारते. बाजारात अनेक प्रकारचे हेअर मास्क उपलब्ध असतात. पण आपण घरच्या घरीही चांगला हेअर मास्क तयार करु शकतो. दही आणि मध एकत्र करुन त्याचे मिश्रण केसांना लावल्यास अतिशय उत्तम हेअरमास्क तयार होतो. हा हेअरमास्क लावल्यानंतर केस पुन्हा शाम्पूने धुवा.
५. कंडिशनिंग
शाम्पू केल्यानंतर कंडिशनिंग करणे ही महत्त्वाची स्टेप आहे. कंडिशनिंगमुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. कंडिशनिंग करण्यासाठी शाम्पूबरोबरच हल्ली रासायनिक कंडीशनर मिळतात. पण घरच्या घरीही आपण काही कंडिशनर तयार करु शकतो. मात्र कंडिशनीग करायलाच हवे, त्यामुळे केस मुलायम राहण्यास मदत होते.