Join us  

Hair Care : केस धुण्यासाठी शाम्पूऐवजी वापरा 2 प्रकारचे बेसन क्लीन्जर, केसांना येईल चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 3:56 PM

केसांवर केमिकलचा वापर टाळा, बेसन क्लीन्जरनं केस धुवा! केसांना चमक आणण्याचा घरगुती उपाय

ठळक मुद्देकेस धुण्यासाठी बेसन क्लीन्जर दोन प्रकारे तयार करता येतं. दही आणि मेथ्यांच्या दाण्यांचा उपयोग करुन बेसन क्लीन्जर तयार करता येतं.

केस सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. केस स्वच्छ करण्यासाठी , केसांना चमक आणण्यासाठी विविध हेअर प्रोडक्टस बाजारात उपलब्ध आहेत. पण केस स्वच्छ करण्यासाठी केमिकल्सयुक्त शाम्पूचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केस केवळ सुंदरच होत नाही तर केसांची चमक देखील वाढते. केस धुण्यासाठी घरच्याघरी तयार केलेल्या बेसन क्लींजरचा वापर केल्यास केस स्वच्छ होतात, केसांवर चमक येते आणि केस गळणं देखील थांबतात. केस धुण्यासाठी बेसन क्लीन्जर दोन प्रकारे तयार करता येतं. दही आणि मेथ्यांच्या दाण्यांचा उपयोग करुन बेसन क्लीन्जर तयार करता येतं.

Image: Google

केस बेसन क्लीन्जरनं का धुवावेत?

केस स्वच्छ करण्याचे गुणधर्म बेसनात असतात. केसांना बेसन लावल्यास केस तर स्वच्छ होतातच सोबतच केस खराब करणारे इतर कोणतेही साइड इफेक्टस होत नाही.  केसांना हवी असलेली चमक सहज  मिळते. 

Image: Google

बेसन आणि दह्याचा क्लीन्जर

बेसन आणि दह्याचा क्लीन्जर तयार करण्यासाठी 2 मोठे चमचे बेसन, 1 मोठा चमचा दही आणि 1 चिमूटभर हळद घ्यावी.  एका मोठ्या वाटीत ही सर्व सामग्री घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांना लावावी. संपूर्ण केसांना ही पेस्ट नीट लावावी. केसांना पेस्ट लावल्यानंतर 10 मिनिटं ती केसांवर राहू द्यावी. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. बेसन आणि दह्याच्या क्लीन्जरमधील बेसनामुळे केसातील घाण निघून जाते. केस स्वच्छ होतात आणि दह्यामुळे केसांना चमक येते. या क्लीन्जरमध्ये वापरण्यात येणाऱ्या हळदीमुळे केसांना संसर्ग होण्याचा धोका टळतो.

Image: Google

बेसन आणि मेथ्यांचं क्लीन्जर

बेसनासोबत मेथ्यांचा वापर करुन केसांना चमक आणता येते. मेथ्यांमुळे केस निरोगी आणि मजबूत होतात.  बेसन आणि मेथ्यांच्या क्लीन्जरमुळे केस स्वच्छ होतात आणि केस गळतीही थांबते. 

बेसन मेथ्यांचं क्लीन्जर तयार करण्यासाठी 1 चमचा मेथ्या आणि 1 कप बेसन घ्यावं. सर्वात आधी मेथ्या पाण्यात उकळून घ्याव्यात. मेथ्या उकळल्यावर पाणी गाळून घ्यावं. मेथ्यांचं हे पाणी बेसनात मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांना आणि केसांना लावावी. 15 मिनिटानंतर केस स्वच्छ धुवावेत.  बेसन आणि मेथ्यांच्या क्लीन्जरमुळे केस स्वच्छ ह्तोअअत आणि केसांना कंडीशनरसारखी चमक येते. 

 

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्स