Join us  

केस फार गळतात म्हणून कापून टाकताय ? पण कापल्यानं खरंच केस गळणं कमी होतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 6:06 PM

केस गळणे ही समस्या आजकाल सगळ्यांनाच भेडसावू लागली आहे. केस लांबसडक असले आणि ते जास्त प्रमाणात गळू लागले, तर अगदी बारीकशी लांबलचक वेणी अजिबातच चांगली दिसत नाही. म्हणून मग अनेकजणी थेट केसच कापून टाकतात. पण असे करणे खरंच केस गळतीच्या समस्येवरचा उपाय ठरू शकतात का ?

ठळक मुद्देकेसांची गळती एकदा सुरू झाली की मोठे केस मेंटेन करायला, त्यांची काळजी घ्यायला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे अनेक जणी केस कापून टाकण्याचा विचार करतात. केसांची काळजी घेणे, आहार योग्य असणे यासोबतच काही ब्युटी ट्रिटमेंट्स घेतल्या तर केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते.

''अगं काय गं.. केस कापलेस का? '' असा प्रश्न एखाद्या मैत्रिणीने विचारला की त्यावर ''अगं हो ना, मला तर केस कापण्याची अजिबातच इच्छा नव्हती. पण काय करू, खूप गळायला लागले होते ना, म्हणून कापावे लागले.. '' असे उत्तर हमखास ऐकायला मिळते. आपणही आपल्या बाबतीत बऱ्याचदा हेच केलेले असते. पण केस गळणे या समस्येवर केस कापणे, हा इलाज होऊच शकत नाही. असे करणे म्हणजे जखम एकीकडे  असणे आणि मलम भलतीकडेच लावणे, असा प्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बाळांतपणात खूप केस गळाल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकतेच तिचे लांबसडक केस कापून एक सुंदर हेअरकट करून घेतला आहे. या संदर्भातला तिचा फोटो आणि पोस्ट तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केली आहे. बऱ्याच जणींना केस गळतीवरचा हा उपाय योग्य वाटतो. पण बदललेली जीवनशैली, आहारात झालेला बदल, प्रदुषण, धुळ आणि केसांची योग्य निगा न राखणे ही केसगळतीची सगळ्यात महत्त्वाची कारणे आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आहारतज्ज्ञ आणि सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.

केस गळती रोखण्यासाठी हे करून पहा१. मीठ, तेल आणि प्रिझर्व्हेटीव्ह अधिक असणारे पदार्थ खाणे टाळा.२. जागरण करणे आणि सकाळी उशिरा उठणे टाळा. ३. केसांचे तेल निघावे म्हणून शाम्पूचा अतिवापर करू नका.

४. दरवेळी वेगवेगळे हेअर ऑईल, शाम्पू आणि कंडीशनर यांचे प्रयोग करणे टाळा.५. केसांसाठी वापरत असलेला कंगवा आठवड्यातून एकदा शाम्पू लावून स्वच्छ धुवा.६. व्हिटॅमिन्ससारख्या असणाऱ्या बायोटिन्सच्या गोळ्या केस गळती थांबवू शकतात.७. शिर्षासन केल्याने डोक्यापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. त्यामुळेही केस गळती कमी होऊ शकते, असेही योगतज्ज्ञांचे मत आहे.८. व्हिटॅमिन बी १२, लोह आणि कॅल्शियमची कमतरता केस गळतीसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे हे घटक पुरविणारे पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमहिला