केस म्हणजे मुलींच्या आणि महिलांच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक. आपले केस लांब, घनदाट आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण वेगवेगळ्या कारणांमुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. वाढते प्रदूषण आणि धूळ ही केसांच्या समस्या वाढण्याची मुख्य कारणे आहेत. कोंडा, केस पांढरे होणे, केस गळणे यांबरोबरच केसांना फाटे फुटण्याचे प्रमाणही सध्या तरुणींमध्ये वाढत आहे. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर हे केस निर्जीव आणि कोरडे होण्याचे आणखी एक कारण आहे. या प्रसाधनांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या रसायनांचा केसांवर वाईट परिणाम होतो आणि ते आधीपेक्षा जास्तच कोरडे पडतात.
केसांना पुरेशी आर्द्रता मिळत नसेल तर खालच्या बाजुने केसांना फाटे फुटतात. एकदा हे फाटे फुटायला सुरुवात झाली की केसांची वाढ कमी होते आणि खालच्या बाजुने केस कोरडे दिसायला लागतात. मग हौसेने वाढवलेले केस कापणे म्हणजेच ट्रीम करणे याशिवाय कोणताही पर्याय तरुणींपुढे उरत नाही. मग इच्छा नसतानाही केस कापावे लागतात. केसांच्या आरोग्यासाठी इतर गोष्टींबरोबरच योग्य आहार, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. याबाबत डॉ. आंचल पांथ यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो अपलोड केला आहे. त्या प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ असून स्पिटएंडस होऊ नयेत यासाठी त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्यांच्या या व्हिडियोला इन्टावर मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाले असून अनेक तरुणींनी त्यांना आपले प्रश्नही विचारले आहेत. पाहूयात काय आहेत हे उपाय
१. तुमचे केस ओले असताना ते अतिशय सावकाश आणि प्रेमाने हाताळा.
२. ओले केस पुसताना कॉटनचा टॉवेल किंवा मऊ टिशर्टचा वापर करा. केसांना जोरजोरात हाताळणे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
३. केस ओले असताना मोठ्या दातांच्या कंगव्याने केस विंचरा, त्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल. केस ओले असताना ब्रशचा वापर करु नका, त्यामुळे केस जास्त खराब होण्याची शक्यता असते.
४. प्रत्येक वॉशनंतर केसांना कंडीशनर लावा. त्यामुळे केस गळण्यापासून तुमची सुटका होऊ शकते.
५. केसांसाठी आठवड्यातून एकदा हेयर मास्कचा वापर करा. धुतलेल्या केसांवर तुम्ही हा हेयर मास्क वापरु शकता. हा मास्क १५ ते २० मिनिटे केसांवर लावून ठेवा. त्यावर शॉवर कॅप लावा आणि नंतर तो धुवून टाका. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होईल आणि फाटे फुटण्यापासून तुमचे केस वाचू शकतील.
६. सध्या एखाद्या समारंभाला जाताना किंवा एरवीही अनेक जणी घाईच्या वेळी हेयर ड्रायर आणि हेयर स्ट्रेटनरचा घरात वापर करतात. मात्र या उपकरणांतून येणारी उष्णता केसांसाठी घातक ठरु शकते. त्यामुळे अशाप्रकारची उपकरणे कमीत कमी वापरा. तसेच जर वापरायचीच असतील तर हिट प्रोटेक्टंट स्प्रेचा वापर करा आणि मग ही उपकरणे वापरा.