केस सतत गळतात त्यामुळे खूप पातळ झालेत अशी तक्रार बहुतांश महिला वारंवार करताना दिसतात. थंडीच्या दिवसांत तर केसांचा कोरडेपणा, कोंडा यांमुळे केस गळण्याच्या समस्येत वाढ होते. इतकेच नाही तर नव्याने केस येण्याचे प्रमाणही अनेकदा घटते. आता यासाठी काय करायचं असा प्रश्न आपल्याला कायमच पडतो. मग पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. आयुर्वेदात असे बरेच घरगुती उपाय असतात जे वापरुन आपण आपल्या सौंदर्यात नक्कीच भर घालू शकतो (Hair Fall Problem Bhringraj for Hair Growth).
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी पारंपरिक भृंगराज वनस्पतीचा घरच्या घरी केसांसाठी कसा वापर करता येईल याचे २ अतिशय सोपे उपाय सांगितले आहेत. तेल लावताना हे उपाय केल्यास केस गळती तर कमी होईलच पण केस वाढण्यासही याची चांगली मदत होईल. आता हे उपाय नेमके कसे करायचे याविषयी...
तेल लावताना काय कराल..
१. भृंगराज वनस्पतीची पाने घेऊन ती बारीक कापून खोबरेल तेलात घालावीत. हे दोन्ही गॅसवर कढई ठेवून त्यात चांगले करम करावे आणि नंतर थंड करावे. काही दिवस हे तेल तसेच ठेवून नंतर ते गाळून केसांना लावावे. हा उपाय ६ ते ८ महिने केल्यास केसगळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास चांगला उपयोग होतो.
२. भृंगराज पाने उपलब्ध नसल्यास बाजारात भृंगराज पावडर सहज मिळते. ही पावडर तेलात मिसळून हे तेल रात्री झोपताना केसांना लावावे. भृंगराज वनस्पतीमध्ये केसांसाठी उपयुक्त असे घटक असल्याने केसांच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास या वनस्पतीचा अतिशय चांगला उपयोग होतो. हे उपाय सहज घरी करता येण्यासारखे असल्याने तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर हे उपाय अवश्य करायला हवेत.
फायदे
१. भृंगराज या वनस्पतीमुळे रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होते आणि त्यामुळे केसांच्या मुळांना याने मसाज केल्यास त्यांना चांगले पोषण मिळते आणि केस गळणे कमी होऊन केसांची वाढ होण्यास सुरुवात होते.
२. तसेच भृंगराजमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने तुमचे केस कमी वयात पांढरे व्हायला लागले असतील तर तुमच्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो.