Join us  

केस गळतात, वाढत नाहीत? साजूक तुपाने करा नियमित मालिश, बघा शुद्ध घी का जादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 5:40 PM

कोरडे आणि निस्तेज केस चमकदार हाेण्यासाठी तसेच केसांची चांगली वाढ होण्यासाठी साजूक तूप अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे तूप आता केवळ खाऊ नका, केसांनाही लावा.

ठळक मुद्देकांदा, लिंबाचा रस किंवा बदाम तेल असे काहीही न टाकता केसांना केवळ तूप लावूनही मालिश करता येते. अशी मालिश करायची असल्यास ही पद्धत वापरावी. 

पुरणपोळी, भात, खिचडी असे पदार्थ आपण तुपाशिवाय खाण्याची कल्पनाही करू शकत नाही. रोजच्या जेवणात तूप खाण्याचे महत्त्व आपल्याला माहिती आहेच. आता केसांना तूप लावून मालिश करण्याचे फायदे  जाणून घ्या. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी अनेक आवश्यक खनिजे तुपामध्ये असतात. त्यामुळे जर तूप लावून डोक्याला मालिश केली तर हे सगळे लाभ केसांनाही मिळतात. केसांचे गळणे अवघ्या काही दिवसांतच लक्षणीय प्रमाणात कमी होते. याशिवाय रूक्ष आणि निस्तेज केस चमकदार दिसू लागतात. 

 

अशा पद्धतीने लावू शकता केसांना तूप१. तूप आणि व्हिटॅमिन ईबाजारात व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल मिळत असतात. या दोन कॅप्सूल फोडा आणि एका वाटीत टाका. यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाका. हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून एकजीव करून घ्या. आता या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेला मालिश करा. दोन तासांनी शाम्पू लावून केस धुवून टाका. हा प्रयोग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करा. अवघ्या काही दिवसातच केसांची गळती कमी होईल. 

 

२. तूप आणि बदाम तेलडोक्यात कोंडा झाला असल्यास हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. दोन टेबलस्पून तूप आणि दोन टेबलस्पून बदाम तेल एकत्र करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित हलवून केसांना मालिश करा. यामुळे कोंडा  कमी होतो.  कोंडा कमी झाल्यावर आपोआपच केसगळती कमी होते.

३. केसांना फाटे फुटत असल्यास..केसांना फाटे फुटत असल्यास केस निरोगी नाहीत, हे लक्षात येते. त्यामुळे केसांच्या बाबतीत ही समस्या जर जाणवत असेल, तर तूप लावून केसांच्या मुळांशी हळूवार मालिश करा. त्यामुळे केस कोरडे होऊन त्यांना फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होईल. 

 

४. तूप आणि कांद्याचा रसकेसांची वाढ खुंटली असल्यास हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी तीन टेबलस्पून साजूक तुप घ्या आणि यामध्ये एक मध्यम आकाराच्या कांद्याचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून केसांना लावा. या उपायाने केसांची चांगली वाढ होते. 

५. तूप आणि लिंबाचा रसकेस अनेकदा खूप निस्तेज, रुक्ष आणि कोरडे होतात. अशा केसांना नवी चमक देण्यासाठी त्यांना नियमितपणे तूप आणि लिंबाचा रस लावणे गरजेचे आहे. या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेची मालिश करा आणि एक ते दोन तासांनी केस धुवून टाका. केस अतिशय सिल्की आणि चमकदार होतील. 

 

अशी करा मालिशकांदा, लिंबाचा रस किंवा बदाम तेल असे काहीही न टाकता केसांना केवळ तूप लावूनही मालिश करता येते. अशी मालिश करायची असल्यास ही पद्धत वापरावी. - आपल्या केसांच्या लांबीनुसार वाटीत तूप घ्या. - ते तापवून कोमट करून घ्या.- यानंतर हलक्या हातांनी केसांची १० ते १५ मिनिटे मालिश करा. केस जोरजोरात चोळू नका. केवळ बोटांच्या टोकाने मालिश करा. - मालिश झाल्यानंतर एक- दोन तासांनी केस धुवून टाका. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी