Join us  

पावसाळ्यात केस फार गळतात, उपाय काय? कोरफड तेल, हे तेल घरी तयार करण्याची कृती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 4:11 PM

कोरफडीमुळे केसांच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. यासाठी कोरफड जेलचं तेल तयार करुन ते केसांना लावणं आवश्यक आहे. हे तेल तयार करुन केसांना लावल्यास केसांच्या अनेक समस्या सुटतात. त्यासाठी आधी हे तेल कसं तयार करायचं आणि केसांना कसं लावायचं हे समजून घ्यायला हवं.

ठळक मुद्देकोरफडीचं तेल तयार करण्यासाठी कोरफडीचं पातं आणि खोबर्‍याचं तेल या दोनच गोष्टींची आवश्यकता असते.कोरफड तेलाचा केसांवर परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस हे तेल लावावं.कोरफड तेल केसांच्या मुळांना मजबूत करतं त्यामुळे केस गळणं थांबतं.

 त्वचा सुंदर करण्या कामी कोरफड उपयुक्त असते हे सगळ्यांनाच माहित आहे. पण कोरफडमधील गुणधर्म केसांचं आरोग्य सुधारण्यास, केस जपण्यास आणि केस वाढण्यास मदत करतात. कोरफडमधे असलेले पोषक तत्त्वं, खनिजं, जीवनसत्त्वं आणि अमिनो अँसिड केसांवर प्रभावी काम करतात. कोरफडीमुळे केसांच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. यासाठी कोरफड जेलचं तेल तयार करुन ते केसांना लावणं आवश्यक आहे. हे तेल तयार करुन केसांना लावल्यास केसांच्या अनेक समस्या सुटतात. त्यासाठी आधी हे तेल कसं तयार करायचं आणि केसांना कसं लावायचं हे समजून घ्यायला हवं.

छायाचित्र- गुगल

कोरफडीचं तेल कसं तयार करणार?

कोरफडीचं तेल तयार करण्यासाठी कोरफडीचं पातं आणि खोबर्‍याचं तेल या दोनच गोष्टींची आवश्यकता असते. यासाठी आधी कोरफडीचं पातं स्वच्छ धुवून घ्यावं. पात्याच्या किनारी असलेले काटे काढून टाकावेत. मग कोरफडीचं पातं कापून त्यातून त्याचा गर काढून घ्यावा. मग हा गर मिक्सरमधे वाटून घ्यावा. जर घरातल्या बागेत कोरफड नसेल तर विकत मिळणारं अँलोवेरा जेल घ्यावं. एका कढईत खोबर्‍याचं तेल आणि कोरफडीचा गरज एकत्र करुन घ्यावा. हे मिश्रण गरम करायला ठेवावं. ते हलकसं तपकिरी रंगाचं होवू द्यावं. गॅस बंद करुन कोरफडीचं तेल गार होवू द्यावं. ते गार झालं की बाटलीत भरुन ठेवावं.

छायाचित्र- गुगल

कोरफडीचं तेल कसं लावावं?

कोरफडीचं तेल लावताना केस भांगातून समान पध्दतीने दोन भागात विभागावेत. मग तेल लावायला सुरुवात करावी. केसांच्या मुळाशी टाळुला हलक्या हातानं मसाज करत तेल लावावं. केसांवर त्याचा परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस हे तेल लावावं. हे तेल लावल्यानंतर अर्धा तासानं केस सौम्य शाम्पूनं धुवावेत.

छायाचित्र- गुगल

कोरफड तेलाचे फायदे

1. कोरडे केस तुटतात. केसांना पुरेसं मॉश्चरायझर मिळणं गरजेचं असतं. कोरफडीच्या गरात पाण्याचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे केसांना हे कोरफडीचं तेल लावल्यास केसांचं मॉश्चरायझर भरपूर वेळ टिकून राहातं.2. केसांच्या मुळाशी म्हणजेच टाळू स्वच्छता नसेल तर केसात कोंडा होतो, खाज येते. कोरफडीच्या तेलातील कोरफडीचे गुणधर्म टाळुशी असलेल्या मृत पेशी काढून टाकतात. हे तेल केसांसाठी नैसर्गिक क्लीन्जरसारखं काम करतं. या तेलामुळे टाळुशी असलेली घाण स्वच्छ होते.

छायाचित्र- गुगल

3. कुरळे केस जास्त तुटतात. त्यामुळे केसांना सारखं कंडीशन करण्याची गरज असते. पण कोरफडीच्या तेलात मॉश्चरायझिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या मुळांना नैसर्गिक तेल तयार करण्यास कोरफडीच्या तेलानं मदत होते. कोरफडीचं तेल केसांना लावल्यास केस मऊ मुलायम होतात.4. पावसाळ्यात केस जास्त गळतात. त्यामुळे या काळात हे कोरफडीचं तेल केसांना लावणं जास्त गरजेचं असतं. हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करतं, त्यामुळे केस गळणं थांबतं.