Join us  

केसांचा फार गुंता होतो, विंचरताना केस तुटतात? आता घरीच बनवा डीटॅंगलिंग स्प्रे.. सोडवा सहज गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 7:29 PM

सतत गुंता होणारे केस सारखे विंचरणे हा उपाय नसून चूक आहे. डीटॅंगलिंग स्प्रे केसातला गुंता सोडवण्याचा सोपा उपाय. विकत नका आणू ,घरीच करा!

ठळक मुद्देडीटॅंगलिंग स्प्रे नियमित वापरल्यास केसातील गुंता कमी होतो.डीटॅंगलिंग स्प्रेमुळे केसातल्या गुंत्याचा प्रश्न तर सुटतोच शिवाय केसही मऊ होतात.डीटॅंगलिंग स्प्रे हा केस ओले असतानाच वापरावा लागतो.

केसात होणारा गुंता ही एक मोठी समस्या असते. सतत गुंता झाल्यानं केस खराब होतात, तुटतात, केस पातळ होतात. केसांची कोणतीही स्टाइल करा केस विस्कटलेले दिसतात. केस काही केल्या सेट होत नाही. असे केस सतत विंचरणे हा पर्याय नसून ती चूक आहे. शिवाय केसांचा गुंता नुसता शाम्पू किंवा तेलानं सुटत नाही. याबरोबरीनं आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे डीटॅंगलिंग स्प्रेची.

Image: Google

डीटॅंगलिंग स्प्रे नियमित वापरल्याने केसातला गुंता तर सुटतोच शिवाय केस मऊ होतात. हा स्प्रे बाहेर मिळत असला तरी केसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि चांगल्या परिणामांसाठी घरीच तयार करावा. हा डीटॅंगलिंग स्प्रे घरच्याघरी तयार करणं सोपं आहे.

Image: Google

डीटॅंगलिंग स्प्रे कसा करणार?

डीटॅंगलिंग स्प्रे तयार करण्यासाठी 1 कप अँपल सायडर व्हिनेगर, 1 कप पाणी, 1 चमचा जोजोबा तेल, कोणत्याही इसेंन्शिअल ऑइलचे 4-5 थेंब आणि स्प्रे बॉटल एवढं साहित्य घ्यावं.

Image: Google

स्प्रे तयार करताना आधी एका बाटलीत अँपल सायडर व्हिनेगर घालावं. त्यात इसेंन्शिअल ऑइलचे 4-5 थेंब घालून ते थोड्या वेळ तसंच ठेवावं. 15-20 मिनिटानंतर त्यात जोजोबा ऑइल घालून हे मिश्रण बाटलीचं झाकण बंद करुन जोरात हलवावं. नंतर त्यात पाणी घालून पुन्हा बाटलीचं झाकण बंद करुन मिश्रण हलवून घ्यावं. झाकण उघडून हे मिश्रण घट्ट तर नाही ना हे एकदा तपासून पाहावं. घट्ट वाटत असल्यास त्यात गरजेनुसार आणखी पाणी घालावं. मग हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरावं.

Image: Google

डीटॅंगलिंग स्प्रे वापरण्यआधी केस आधी शाम्पूनं धुवावेत. मग केसांना कंडिशनर लावावं. केस धुतल्यानंतर ओल्या केसातच स्प्रे बॉटलमधील हे द्रावण केसांवर वर पासून खालपर्यंत फवारावं. केस थोडा वेळ तसेच राहू द्यावे आणि मग कोरडे करावेत. केस धुतल्यानंतर डीटॅंगलिंग स्प्रे नियमित वापरल्यास काही दिवसातच केसातला गुंता कमी होतो, केस मऊ होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी