Join us  

काही केल्या केस वाढतच नाहीत? लांबसडक केसांसाठी डाएटमध्ये हवेत ५ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 12:23 PM

Hair Growth Remedies Diet Tips for hair care : शरीरात प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजे, कॅल्शियम असे सगळे घटक योग्य प्रमाणात असतील तर त्वचा, केस आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

आपले केस लांबसडक आणि मजबूत असावेत असं प्रत्येकीला वाटतं. पण काही कारणेने केस खूप गळतात तर काही वेळा कितीही उपाय केले तरी केस अजिबात वाढत नाहीत. मग केसांची वाढ अचानक का खुंटली असा प्रश्न आपल्याला पडतो. कधी केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने तर कधी आणखी काही कारणांनी केसांची वाढ खुंटते. अशावेळी आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतो किंवा काही ना काही उत्पादने लावून केस वाढावेत यासाठी प्रयत्न करतो. मात्र याचाही म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारातूनही केसांना योग्य ते पोषण मिळायला हवे. शरीरात प्रथिने, व्हिटॅमिन्स, खनिजे, कॅल्शियम असे सगळे घटक योग्य प्रमाणात असतील तर त्वचा, केस आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा (Hair Growth Remedies Diet Tips for hair care). 

१. काळे तीळ 

यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक असे घटक असतात जे शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. तसेच या तिळांचा आहारात समावेश केल्यास केसगळती कमी होते. त्यामुळे केस लांबसडक वाढायचे असतील तर न चुकता रोज १ चमचा काळे तीळ खायला हवेत. पण तुम्हाला पाळीत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर हे तीळ खाणे टाळावे.

(Image : Google)

२. आक्रोड 

यामध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे डोक्याची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच केस मजबूत होण्याच्या दृष्टीने आक्रोड खाणे फायदेशीर असते. म्हणूनच न चुकता दररोज १ ते २ आक्रोड खाल्ल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. 

३. ओलं खोबरं 

यामध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, लोह आणि मॅग्नेशियम असे अतिशय महत्त्वपूर्ण घटक असतात. हे सगळे घटक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. यामुळे केसांची नैसर्गिक वाढ सुधारण्यास चांगली मदत होते. नैसर्गिक कंडीशनर म्हणून याचा उपयोग होतो. म्हणून दररोज खोबरं किंवा नारळ पाणी आवर्जून खायला हवं. 

४. खजूर 

खजूर हा लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्यास केसगळती कमी होते. केसांची खुंटलेली वाढ कमी होण्यास याची चांगली मदत होते. खजुराने केसांना चांगले पोषण मिळत असल्याने रोज २ खजुराच्या बिया आवर्जून खायला हव्यात.  

५. शेंगादाणे 

यात प्रोटीन, व्हिटॅमिन बी ६ असल्याने केसांचे पोषण होण्यासाठी दाणे फायदेशीर असतात. यामुळे केसांचे तुटणे कमी होते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. रोज अर्धी वाटी भाजलेले दाणे आवर्जून खायला हवेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी