Join us  

केस दाट-लांबसडक हवेत? जुही परमार सांगते १ सोपा घरगुती उपाय, केस वाढतील भरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 10:54 AM

Hair Growth Tips by Actress Juhi Parmar : आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा उपाय करता येतो.

ठळक मुद्देबाजारातली केमिकल असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय केलेले केव्हाही चांगले केस लांबसडक-दाट व्हावेत यासाठी फायदेशीर उपाय नक्की ट्राय करा

आपले केस काही केल्या वाढत नाहीत, केस गळत असल्याने पातळ झालेत तर कधी कोंडा झाला अशा एक ना अनेक तक्रारी आपल्या आजुबाजूला असणाऱ्या महिला करत असतात. केस वाढावेत यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरुन बघतो तर कधा शाम्पू बदलतो. इतकेच नाही तर पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करुन आपण हेअर स्पा किंवा आणखी काही ट्रिटमेंटसही करतो. पण आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासूनही आपण सौंदर्यासाठीचे अगदी झटपट आणि सोपे उपाय करु शकतो. प्रसिद्ध अभिनेत्री केस लांब आणि दाट व्हावेत यासाठी एक सोपा उपाय आपल्याशी शेअर करतात. जुही सौंदर्याबाबत नेहमीच काही ना काही टिप्स देत असतात. पाहूयात आता त्या कोणता खास उपाय सांगतात (Hair Growth Tips by Actress Juhi Parmar).

कसा करायचा उपाय...

१. एक कांदा आणि एक बटाटा यांच्या फोडी करुन त्या मिक्सरमधून बारीक करुन घ्यायच्या.

२. त्यानंतर ही पेस्ट गाळून त्याचे पाणी एका वाटीत घ्यायचे. 

(Image : Google)

३. यात अर्धे लिंबू पिळायचे आणि १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा एरंडेल तेल घालायचे. 

४. सहज शक्य असल्यास रोजमेरी तेलही घालावे. हे मिश्रण चांगले एकजीव करुन ते केसांच्या मुळांना सगळीकडे लावायचे. 

५. अर्धा ते १ तास केस तसेच ठेवून नंतर हलक्या शाम्पूने केस धुवायचे. 

फायदे 

१. कांदा केस तुटणे आणि पातळ होण्यास प्रतिबंध करतो.

२. बटाटा केसांच्या निर्मितीसाठी पोषक असतो, त्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते.

३. लिंबाचा रस डोक्यातील कोंडा प्रतिबंधित करतो तसेच कोरडे आणि जुन्या झालेल्या केसांमध्ये जान आणण्यासाठी उपयुक्त ठरतो. 

४. खोबरेल तेल केसांना आर्द्रता देते आणि केसांची वाढ होण्यास फायदेशीर ठरते. 

५. एरंडेल तेल नैसर्गिक कंडिशनर असून केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त असते. 

६. रोझमेरी तेलाच्या वापराने केसांची जाडी आणि वाढ दोन्ही सुधारते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी