महिलांचे वय कितीही जास्त असले तरी त्यांचे आपल्या केसांवरील प्रेम कधीही कमी होत नाही. सध्या ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचेही काळे, दाट केस दिसून येतात. कारण केस पांढरे दिसायला लागल्यानंतर लोक लगेचच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यांयांचा अवलंब करतात. वाढत्या वयात केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी सध्या कोणतंही उत्पादन वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब केला तर साईड इफेक्ट्सचा धोका कमी असतो आणि केस नैसर्गिकरित्या चांगले राहतात.
आपण काही नैसर्गिक उपाय करून केस काळे, लांब आणि जाड बनवू शकता. असाच एक उपाय सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुग यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितला आहे. पूनम यांनी घरी आवळा जेल बनवून केसांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, तसेच हे जेल बनवण्याच्या पद्धती आणि फायदे सांगितले आहेत.
आवळ्याचे जेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य
४ ते ५ आवळे, १ मध्यम आकाराचा कांदा, १० ते १५ तुळशीची पानं, एक लहान वाटी नारळाचं तेल
कृती
सगळ्यात आधी आवळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पाण्यात चांगले उकळून घ्या. त्यानंतर व्यवस्थित मॅश करून घ्या. आवळ्याची पेस्ट व्यवस्थित बनवा. आवळ्यासह तुम्ही कांदा, कढीपत्ता, तुळशीची पानं उकळवण्यासाठी पाण्यात घालू शकता. त्यानंतर मिक्सरमध्ये हे साहित्य वाटून घ्या. सगळे जिन्नस वाटून झाल्यानंतर जेलप्रमाणे दिसतील. मिश्रणात नारळाचं तेल घाला. नारळाचं तेल या मिश्रणात घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र व्हायला हवं.
त्यानंतर तुम्ही हे मिश्रण एका डब्ब्यात भरून ठेवू शकता. आपण हे जेल कोरड्या आणि तेलकट केसांवर वापरू शकता. जर तेलकट केस असतील तर जेलमध्ये लिंबाचा रस घाला. इतकंच नाही तर आपण केसांमध्ये कोणतेही केमिकल ट्रिटमेंट केले असल्यास आपण हे जेल लावून केसांचे पोषण करू शकता. केस धुण्याच्या १ तास आधी हे मिश्रण लावा सुकल्यानंतर केस धुवून टाका.
फायदे
आवळा व्हिटामीन ई चा एक चांगला स्त्रोत आहे. जर तुम्ही आवळ्याचे जेल केसांना लावले तर तुमचे केस वेगानं वाढू शकतात. जर तुमचे केस खूप गळत असतील तर आवळ्याचे तेल लावल्यानं तुम्हाला फायदा मिळेल. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाला आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं.
आवळ्यात अँटीआॅक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांच्या मुळांना लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता.
आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. केसांच्या मजबुतीसोबतच केस काळे करण्यासाठीही आवळा अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामुळेच अनेक शॅम्पू आणि तेल तयार करण्यासाठीही याचा वापर करण्यात येतो. आवळ्याची पावडर ब्रशच्या मदतीने केसांना लावू शकता. साधारणतः अर्धा तास ठेवून केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका.