पावसाळ्यात केस गळण्याचं प्रमाण वाढतं. काहींचे तर इतके केस गळतात की त्यांना टक्कल पडण्याची भीती वाटते. मग वेगवेगळे शाम्पू, महागड्या ब्रॅण्डची तेलं यांचे उपाय करुन पाहिले जातात. पण समस्या आहे तशीच राहाते. कारण जी समस्या शरीरात आहे ती बाह्य उपचारांनी कशी बरी होईल. केस गळण्यासंबंधात झालेला अभ्यास सांगतो की, पोटाच्या आरोग्याचा आणि केसांचा जवळचा संबंध असतो. पचन क्रिया जर बिघडलेली असेल तर केस गळण्याची समस्या उद्भवते. आपण घेत असलेला आहार हा जर व्यवस्थित असेल तरच पचनक्रियाही चांगली राहाते. त्यामुळे केसांच्या समस्येचा विचार करताना तो केवळ सौंदर्योपचाराच्या दृष्टिकोनातून न करता आहार-पचन आणि केस या दिशेने व्हायला हवा.
छायाचित्र: गुगल
पचनक्रिया आणि केस गळण्याचा काय संबंध
अभ्यासक सांगतात की पोटात आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या हजारो प्रजाती असतात. या जीवाणूंच्या मदतीनेच आतडे पचनाचं काम करतात. या जीवाणूंमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्यही चांगलं राहातं.
प्रामुख्याने आतड्यातील चांगले जीवाणू हे पोटात विकरांचं प्रमाण वाढवण्याचं काम करतात. हे विकर आपण घेतलेल्या आहारात पोषक घटक निर्माण करतात. या पोषक घटकांचा उपयोग संपूर्ण शरीर करतं. आपल्या आहारातून क, ब 12, ब 3 ही जीवनसत्त्वं, फॉलिक अँसिड आणि बायोटीन हे महत्त्वाचे घटक आपल्या केसांपर्यंत पोहोचतात. याचा चांगला परिणाम केसांवर होतो. जर पोटातील आतड्यात चांगले जीवाणू तयार झालेच नाहीत तर केसांना पोषण मिळत नाही आणि ते गळतात. तसेच हार्मोन्स बदलल्यानेही केसांवर परिणाम होवून केस गळायला लागतात.
छायाचित्र: गुगल
त्यामुळे आपले केस गळताय याचा केवळ ऋतुशी संबंध न जोडता ही समस्या जर कायमची असेल तर आपल्या पचनसंस्थेत काहीतरी बिघाड असल्याचं समजावं. तसेच आपण घेत असलेल्या आहाराकडे लक्ष द्यावं. केस चांगले करण्यासाठी आधी आहार चांगला ठेवून पोटाचं आरोग्य जपावं असं अभ्यासक म्हणतात.