नारळाचं पाणी पिल्यानंतर तरतरी येते, ऊर्जा मिळते हा अनुभव नारळ पाणी पिल्यानंतर लगेच जाणवतो. हेच नारळाचं पाणी केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याकडे दुर्लक्ष केल्यास केसांचं झालेलं नुकसान हिवाळा संपला तरी भरुन निघत नाही. केस कोरडे होणं, टाळुची त्वचा कोरडी होणं, कोंडा होणं, डोक्यात खाज येणं, केस गळणं, केसांना दोन तोंडं फुटणं अशा अनेक समस्या नारळाच्या पाण्यानं सहज सुटतात. यासोबतच नारळ पाण्याच्या उपयोगानं केस पांढरे होण्यापासूनही रोखले जातात.
Image: Google
नारळाचं पाणी केसांसाठी उपयोगी कसं?
नारळाच्या पाण्यात अँण्टिऑक्सिडण्टस, अमिनो अँसिड, पचनास मदत करणारे विकर, ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक यांचं प्रमाण भरपूर असतं. तज्ज्ञ म्हणतात की, पोषण मुल्यांचा विचार करता दुधापेक्षाही नारळाच्या पाण्यात ते जास्त आढळतात. हेअर एक्सपर्टही केसांना नारळ पाणी वापरण्याचा सल्ला देतात. केसांच्या संबंधित वेगवेगळ्या फायद्यांसाठी नारळ पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.
1. केस मुळापासून मजबूत असले तरच केस गळतीची समस्या थांबते. केस मजबूत होण्यासाठी नारळाच्या पाण्यानं टाळुची मसाज करावी. या मसाजमुळे केसांची लवचिकताही वाढते. नारळ पाण्याचा केसांसाठी नियमित उपयोग केल्यास केस गळतीची समस्या सुटते.
2. डोक्यात खाज येत असल्यास नारळाचं पाणी खूपच उपयुक्त आहे. नारळाच्या पाण्यानं टाळुला पोषक घटक मिळतात. नारळाच्या पाण्यानं टाळुची त्वचा ओलसर राहाते आणि त्यामुळे कोंड्याची समस्या निर्माण होत नाही.
3. कुरळे केस मऊ मुलायम करण्यासाठी तसेच केसांना उंदरी लागली असल्यास नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं. नारळाच्या पाण्यात दाह आणि सूज विरोधी घटक असतात. त्यामुळे टाळुच्या त्वचेचं संसर्ग होण्यापासून संरक्षण होतं.
Image: Google
केसांना नारळ पाणी कसं वापरावं?
केसांसाठी खोबर्याचं तेल जितकं उपयुक्त तितकंच नारळाचं पाणीही. नारळाच्या पाण्यानं केसांशी निगडित विविध समस्या सहज सुटतात. केसांसाठी नारळ पाणी वापरण्याच्या तीन पध्दती आहेत.
1. वाटीभर नारळ पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण टाळुच्या त्वचेला आणि केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावं. हे मिश्रण लावून झाल्यानंतर 20 मिनिटं ते केसांवर तसंच राहू द्यावं. केस नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा ह उपाय केल्यास फायदा होतो. या उपायानं केसातला कोंडा जातो.
Image: Google
2. एक कप नारळ पाण्यात एक चमचा अँपल सायडर ( सफरचंदाचं व्हिनेगर) घालावं. ते चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण केसांना लावावं. 10 मिनिटानंतर केस कोमट पाण्यानं धुवावेत. केस मऊ मुलायम करण्यासाठी तसेच केसांच्या मुळांचं पोषण होण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा.
3. एका वाटीत नारळाचं पाणी घेऊन केवळ त्याने मसाज केली तरी केसांच्या कोरडेपणाची समस्या काही आठवड्यात सुटते.