Join us  

सुंदर केसांसाठी मलायका अरोरा स्वत: तयार करते औषधी तेल; ते तेल बनवण्याची ही कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 6:53 PM

हिवाळ्यात काय एरवीही केस चांगले राहाण्यासाठी काय करता येईल याचा उपाय अभिनेत्री मलायका अरोराने सांगितला आहे. आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर तिने हा उपाय सांगून केसांचे अनेक प्रश्न घरच्या घरी उपाय करुन सोडवता येतील याची खात्री दिली आहे.

ठळक मुद्दे मलायका लावत असलेलं तेल म्हणजे 5 गोष्टींचं मिश्रण आहे.औषधी तेलासाठी घाण्याचं खोबर्‍याचं, ऑलिव्ह आणि एरंड्याचं तेल वापरलं आहे.हे औषधी तेल सगळ्यांसाठी उपयुक्त असून केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचं मलायका सांगते.

एरवी बरे दिसणारे केस हिवाळ्यात मात्र कोरडे आणि रुक्ष होतात, केसात गुंता होतो, डोक्यात कोंडा होवून सारखी खाज सुटते. केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. हिवाळा म्हणजे केसांचा शत्रूच जणू. पण हिवाळ्यात काय एरवीही केस चांगले राहाण्यासाठी काय करता येईल याचा उपाय अभिनेत्री मलायका अरोराने सांगितला आहे. आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर तिने हा उपाय सांगून केसांचे अनेक प्रश्न घरच्या घरी उपाय करुन सोडवता येतील याची खात्री दिली आहे.मलायका या व्हिडीओत सांगते, की ‘वीकेण्ड हा माझ्यासाठी खूप खास असतो. त्या दिवशी मी निवांत केसांना तेल लावून चंपी करते. खरंतर हे सर्वजणीच करतात. केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मसाज करणं ही आवश्यक बाब आहे. पण केसांना चंपी करण्यासाठी मी जे तेल वापरते ते मात्र खास आहे. हे तेल म्हणजे एक औषध आहे, जे केसांच्या अनेक समस्यांवर काम करतं.’

Image: Google

मलायकानं हे तेलाचं गुपित सगळ्यांसाठी या व्हिडीओतून उघड केलं. मलायका लावत असलेलं तेल म्हणजे 5 गोष्टींचं मिश्रण आहे. यासाठी तिने घाण्याचं खोबर्‍याचं, ऑलिव्ह आणि एरंड्याचं तेल वापरलं आहे. तिन्ही तेल हे घाण्याचे असावेत असा तिचा आग्रह आहे. कारण घाण्याच्या तेलात जी शुध्दता आणि पोषक घटक असतात ते नेहमीच्या तेलात मिळत नाही. शिवाय घाण्याच्या तेलात कोणतंही रसायन घातलेलं नसतं. त्यामुळे घाण्याच्या तेलाची अँलर्जी होण्याचा धोकाही टळतो.या तीन तेलांसोबतच मलायकानं मेथी दाणे आणि कढीपत्ताही वापरला आहे. केसांसाठीचं औषधी तेल तयार करण्याची प्रक्रिया मलायकानं सांगितली आहे. ती म्हणते की, घाण्याचं खोबरेल, ऑलिव्ह आणि एरंडेल तेल घ्यावं. तिन्ही तेल समप्रमाणात घ्यावीत. तिने प्रत्येक तेल 100 मि.ली घेतलं. ते एका काचेच्या मोठ्या बाटलीत एकत्र केलं. हे तीन तेल एकत्र केल्यानंतर तिने त्यात मूठ भरुन मेथ्या आणि कढीपत्त्याची ताजी पानं घातली. बाटलीला झाकण लावून तिनं ते चांगलं हलवून घेतलं. हे तेल काही दिवस तसंच ठेवायला सांगितलं. एक पाच ते सहा दिवसात या पाच गोष्टीतील पोषक घटक एकमेकात चांगले मिसळतात. मेथ्या आणि कढीपत्त्यातील अर्क तेलात चांगला उतरतो.

 

Image:Google

पाच गोष्टी मिसळून त्या बाटलीबंद केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी हे तेल उपयोगात आणावं. हे तेल कितीही दिवस आणि महिने टिकू शकतं असं मलायका म्हणते. केसांना लावण्यासाठी हे तेल घेताना आधी बाटली हलवून घ्यावी. एका वाटीत जेवढं लागतं तेवढं तेल काढून घ्यावं. ते गॅसवर किंवा मायक्रोवेवमधे थोडं गरम करावं. तेल कोमट असतानाच वाटीत बोटं बुडवून तेलाच्या बोटांनी केसांच्या मुळाशी हलका आणि गोलाकार मसाज करत तेल लावावं. तेल लावून झाल्यावर साधारणत: 45 मिनिटांनी किंवा एक तासानं केस सौम्य शाम्पूनं चांगले धुवावेत. मलायका म्हणते आठवड्यातून फक्त एकदाच हे तेल वापरलं तरी या तेलाचा परिणाम केसांवर लगेच दिसायला लागतो. काही आठवड्यातच केसांचा पोत सुधारलेला दिसतो. केस दाट तर होतातच शिवाय लांब झालेलेही लक्षात येतं.हे औषधी तेल सगळ्यांसाठी उपयुक्त असून केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगत ते तयार करुन वापरण्याचा आग्रह मलायका करते.

48 व्या वर्षीही मलायकाचे दाट, लांब आणि काळेभोर केस पाहून हे औषधी तेल किती पॉवरफुल असेल याची खात्री पटते.

Image: Google

मलायकाच्या औषधी तेलाचे विशेष काय?

1. मलायकाने केसांसाठी औषधी तेल तयार करताना 5 गोष्टी वापरल्या आहेत. खोबर्‍याचं, ऑलिव्ह आणि एरंड्याचं घाण्यातून काढलेलं तेल वापरलेलं आहे. घाण्याचं तेल वापरल्यानं तिन्ही तेलात जास्तीत जास्त पोषक तत्त्वं असून तेल हे खात्रीनं शुध्द असतं.

2. घाण्यातून काढलेल्या खोबरेल तेलामुळे केस कमजोर होऊन तुटण्यापासून वाचतात. या तेलामुळे दूषित घटकांपासून सुरक्षित ठेवणारा एक थर केसांवर तयार होतो. खोबरेल तेलामुळे केस दाट होतात आणि मजबूतही होतात. खोबर्‍याच्या तेलानं टाळूला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे टाळूकडून तेलातील जास्तीत जास्त पोषक तत्त्वं शोषली जातात. त्याचा परिणाम म्हणून केस लवकर पांढरे होत नाही. खोबर्‍याचं तेल टाळूत आद्रता टिकवतं. विशेषत: हिवाळ्यासारख्या कोरड्या वातावरणात टाळूतील मॉइश्चर शाबूत राहून त्याचा परिणाम म्हणून केस गळायचे थांबतात. खोबर्‍याच्या तेलामुळे टाळूला मिळणार्‍या पोषणाचा फायदा म्हणजे केसात कोंडा, उवा, लिखा होण्याचा धोका टळतो.

Image: Google

3. घाण्यातून काढलेल्या शुध्द ऑलिव्ह तेलात मॉश्चरायझिंग घटक भरपूर प्रमाणात असतात. कंडीशनर म्हणून ऑलिव्ह तेल केसांसाठी काम करतं. या तेलामुळे केस मऊ होतात, त्यात गुंता होत नाही. केसांना चमक येते. ऑलिव्ह तेलामुळे केसांचं खोलवर कंडिशनिंग होतं. टाळूचं पोषण होऊन केसांच्या मुळाशी कोरडेपणा निर्माण होत नाही. परिणाम म्हणून कोंडाही होत नाही. तसेच ऑलिव्ह ऑइलमुळे केसांना जे पोषण मिळतं त्यामुळे केसांना दोन तोंडं फुटून केस खराब होत नाही.

4. एरंडेल तेलामुळे टाळूकडील रक्तप्रवाह सुधारतो आणि केस वाढण्यास चालना मिळते. एरंडेल तेलाची गुणवत्ता इतकी की हे तेल महिन्यातून एकदा लावलं तरी ते इतर तेलांच्या तुलनेत केस वाढवण्यासाठी पाचपट फायदेशीर ठरतं. एरंडेल तेलामुळे टाळूतील आद्रता टिकून राहाते. त्यामुळे डोक्यात खाज येणे, कोंडा होणे या समस्या निर्माण होत नाही. एरंडेल तेलात जिवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी घटक असल्याने हे तेल वापरल्याने केसात कोंडा होत नाही.

5. मेथ्यांच्या दाण्यात लेसिथिन हा घटक असतो. केसांच्या मुळांना खोलवर आद्रता देण्याचं काम मेथ्या करतं. यामुळे केसांची मुळं पक्की होतात. मेथ्यांमधे प्रथिनं, अमिनो अँसिड असतात. यामुळे केस दाट होण्यास मदत मिळते. मेथ्यांमधे बुरशीविरोधी आणि जिवाणुविरोधी घटक असतात. त्यामुळे मेथ्यांच्या उपयोगानं टाळू निरोगी राहातो.मेथ्यांमधे दाहविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या मुळाशी खाज येणं, दाह होणं या समस्या दूर होतात. ऑक्सिडेशनमुळे केस पेशी नष्ट होण्यापासून वाचतात. मेथ्यांमधे चिकट स्वरुपातलं फायबर असतं. त्यामुळे ते आद्रता शोषून घेतं. त्याचा परिणाम म्हणून केस चमकतात आणि केसांचा पोतही मऊ होतो. मेथ्यांमधे लोह आणि पोटॅशिअम असतं. त्याचा उपयोग केस लवकर पांढरे होत नाही. केस काळे ठेवणार्‍या मेलानिनच्या निर्मितीसाठी आवश्यक खनिजं मेथ्यांमधून मिळतात. केश बीजकोषांना पोषक तत्त्व मिळून केस नैसर्गिकरित्या काळे राहातात.

Image: Google

6 . कढीपत्त्यात असलेली प्रथिनं केस वाढण्यास आवश्यक असतात. तसेच केस गळती रोखण्यास आवश्यक असणारे बेटा केरोटिन आणि अमिनो अँसिड कढीपत्त्यात असतात. म्हणूनच कढीपत्त्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. कढीपत्त्यात केस काळेभोर ठेवणारे घटक, अँण्टिऑक्सिडण्टस आणि जीवनसत्त्वं असतात. कढीपत्त्यात आयोडिन, सेलेनिअम, झिंक आणि लोह अशी खनिजं असतात त्याचा परिणाम म्हणून केस पांढरे होण्यापासून वाचतात.  कढीपत्त्यात बुरशीविरोधी आणि जिवाणुविरोधी घटक असतात. तसेच कढीपत्त्यामुळे केस आणि टाळू स्वच्छ राहाण्यास मदत होते. केस मऊ होतात आणि केसांचं पोषण होतं.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स