प्रत्येक घरात पूजेसाठी तुळशीचं रोपटं असतंच. धार्मिकदृष्ट्या तुळस जितकी महत्वाची तितकीच ती त्वचा आणि केसांसाठीही महत्वाची आहे. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे केसांच्या विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. तुळशीचा विविध स्वरुपात वापर करुन केसातला कोंडा, केसांचा रुक्षपणा , पांढरे केस या केसांच्या समस्या सहज सोडवता येतात. केस गळती थांबवण्यासाठी तुळशीच्या पानांचा हेअर मास्क उपयोगी पडतो. तुळशीचा हेअर मास्क लावल्यानं केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. केसांच्या विविध समस्यांवर वेगवेळ्या प्रकार हेअर मास्क करुन उपाय करता येतो.
Image: Google
केस दाट करण्यासाठी
केस लांब आणि दाट करण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. केसांना लावायच्या तेलात तुळशीची पानं रगडून मिसळावी . हे मिश्रण एक तास तसंचं ठेवावं. तासाभरानं तुळशीची पानं मिसळलेल्या तेलानं केसांना हलक्या हातानं मसाज करावा. केसांना ते लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस सौम्य शाम्पूचा वापर करत धुवावेत. तुळशीच्या पानं मिसळलेलं तेल वापरल्यानं केस गळती थांबते. केस लांब आणि मुलायम होतात.
Image: Google
पांढऱ्या केसांसाठी
बदललेल्या जीवनशैलीमुळे केस लवकर पांढरे होण्याची समस्या उद्भवते. शरीरात बी 12 या जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास केस पांढरे होतात. या समस्येवर उपाय म्हणून तुळस आणि आवळ्याच्या पावडरचा उपयोग होतो. हेअर मास्क तयार करण्यासाठी आवळा पावडर आणि तुळशीची पावडर समप्रमाणात एकत्र करावी. यात कोमट पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांना लावावी. एक तासभर हा लेप केसांवर राहू द्यावा. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस करायला हवा.
Image: Google
केसातला कोंडा घालवण्यासाठी
केसातील कोंडा घालवण्यासाठी तुळशीचा हेअर मास्कचा उपयोग करता येतो. यासाठी तुळशीची पानं आणि कढीपत्याची पानं वापरावीत. तुळशीची आणि कढीपत्त्याची पानं समप्रमाणात घ्यावीत. ही पानं खलबत्त्यात कुटून त्याची पेस्ट करावी. या पेस्टमध्ये पेपरमिंट इसेन्शियअल ऑइलचे दोन थेंब घालावेत. पेस्ट नीट मिसळून घ्यावी. ही पेस्ट केसांना लावावी. या पेस्टमध्ये थोडं दही घातलं तरी चालतं. केसांवर हा लेप 20-25 मिनिटं राहू द्यावा. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. कढीपत्त्याचा हा हेअर मास्क केसातला कोंडा कमी होतो.