Join us  

कोरड्या रुक्ष केसांवर किती वैतागाल? 2 होममेड हेअर मास्कमुळे जडेल केसांवर प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 7:48 PM

Hair Problem Solution: केसांना उत्तम पोषण मिळण्यासाठी घरी तयार केलेलं हेअर मास्क रात्रभर लावून ठेवणं हा उत्तम उपाय आहे. हे हेअर मास्क लावल्यानं केसांचं कंडिशनिंग होवून केस चमकतात आणि केसांशी संबंधित अनेक प्रश्न सहज सुटतात.

ठळक मुद्देऑलिव्ह तेल आणि कोरफड जेल या दोन गोष्टी वापरुन उत्तम गुणांचं हेअर मास्क तयार करता येतं.एरंडयाच्या तेलाचा वापर करुन तयार केलेल्या हेअर मास्कमुळे केस मुलायम होतात.टाळुच्या त्वचेचा कोरडेपणा घालवून केसांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रभर हेअर मास्क केसांवर ठेवणं आवश्यक असतं.

थंडीत त्वचा कोरडी होणे ही नैसर्गिक बाब आहे. पण अनेक गोष्टींचा वापर करुन त्वचेचा कोरडेपणा कमी करता येतो. केसांच्या आरोग्यासाठी, सुंदर, लांब आणि मजबूत केसांसाठी टाळुची त्वचा ही महत्त्वाची असते. टाळुची त्वचा ओलसर असेल , आद्र्रता असेल तरच केस निरोगी आणि सुंदर राहातात. केसाच्या संबंधित कोणतीही समस्या असो तिचा उगम हा टाळूकडून अर्थात केसांच्या मुळाकडूनच होतो. टाळुच्या त्वचेचं योग्य पोषण झालं तर टाळूची त्वचा निरोगी राहून केसांच्या अवघड समस्या सहज दूर होतात.

टाळुची त्वचा जपण्यासाठी, ती ओलसर ठेवण्यासाठी, केसांच्या मुळांचं पोषण होण्यासठी रात्रभर हेअर मास्क लावून ठेवणं गरजेचं असतं. रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं ही गोष्ट नुकसानकारक असते असं हेअर एक्सपर्ट म्हणतात. तेच हेअर एक्सपर्ट केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी रात्रभर केसांना हेअर मास्क लावण्यास सांगतात. पण हा हेअर मास्क होममेड असला तर केसांना जास्त फायदा होतो.

Image: Google

केसांना रात्रभर हेअर मास्क लावल्याने केसांना चमक येते. तसेच नवीन केस येण्यास मदत होते. ऑलिव्ह तेल, मेथ्या, कढीपत्ता, खोबर्‍याचं तेल यासारख्या स्वयंपाकघरात सहज आढळणार्‍या गोष्टींपासून हेअर मास्क तयार करता येतं. या हेअर मास्कमुळे केसांच्या सर्व समस्यांचं मूळ असलेला टाळुच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.केसांना उत्तम पोषण मिळण्यासाठी घरी तयार केलेलं हेअर मास्क रात्रभर लावून ठेवणं हा उत्तम उपाय आहे. हे हेअर मास्क लावल्यानं केसांचं कंडिशनिंग होवून केस चमकतात.

Image: Google

ऑलिव्ह तेलाचं हेअर मास्क

केवळ दोन घटकांचा वापर करुनही प्रभावी हेअर मास्क तयार करता येतं. यासाठी ऑलिव्ह तेल आणि कोरफड जेल या दोनच गोष्टींची गरज असते. यासाठी एका वाटीत 4 चमचे ऑलिव्ह तेल आणि त्यात 1 चमचा कोरफड जेल घालून ते नीट एकत्र करावं. मिश्रण नीट एकजीव झालं की मग केसांना लावण्यासाठी ते तयार होतं.

कसं लावावं हेअर मास्क?

हेअर मास्क लावण्याआधी केस आधी नीट विंचरलेले हवेत. केस विंचरुन मधे भांग पाडून दोन्ही बाजुंनी केस समान विभागावेत. वाटीतलं मिश्रण बोटांनी टाळूला मसाज करत लावावं. हा हेअर मास्क लावताना मसाज करत लावणं हे जास्त गरजेचं असतं. हलक्या हातांनी 10 मिनिटं मसाज करत हे हेअर मास्क केसांना लावावं.हेअर मास्क लावून झाल्यावर केसांवर शॉवर कॅप घालावी. हे हेअर मास्क रात्रभर केसांवर राहायला हवं. दुसर्‍या दिवशी सकाळी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत आणि केसांना कंडिशनरही लावावं.ऑलिव्ह तेलाचा हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावल्यास टाळुच्या त्वचेचा कोरडेपणा कमी झाल्याचं सहज लक्षात येईल.

Image: Google

खोबर्‍याचं तेल आणि बियरचं हेअर मास्क

केस मऊ मुलायम आणि चमकदार होण्यासाठी एरंड्याचं तेल हा उत्तम पर्याय आहे. हे हेअर मास्क तयार करण्यासाठी 4 चमचे कोमट एरंड्याचं तेल आणि 2 चमचे खोबर्‍याचं तेल घ्यावं. हे दोन्ही तेल एकत्र केल्यावर त्यात 1 चमचा बियर घालावी आणि मिश्रण पुन्हा एकजीव करावं.

Image: Google

हे हेअर मास्क लावण्याआधी केस नीट विंचरुन घ्यावेत. जर केस जास्तच खराब असतील तर या हेअर मास्कमधे थोडं मध घालावं. हा हेअर मास्क केसांच्या मुळांशी हलका मसाज करत लावावा. 10-15 मिनिटं मसाज आवश्यक असते.हेअर मास्क लावून झाल्यावर डोक्यावर शॉवर कॅप घालून केस झाकावेत. दुसर्‍या दिवशी सकाळी केसांना शाम्पू आणि कंडिशनर लावून केस धुवावेत.या मास्कमुळे टाळुच्या त्वचेचा आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावावा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स