Join us  

उन्हाळ्यात हरवली केसांची चमक? डीप कंडिशनिंगचे 5 सोपे उपाय; दूध-मध -कोरफडीने चमकतील केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 7:11 PM

केसांना डीप कंडिशनिंग देण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची काय गरज? घरच्याघरी दूध-मध-कोरफड-एरंडेल तेल आणि शिया बटरनं डीप कंडिशनिंग करुन केसांवर चमक आणता येते.

ठळक मुद्देदही लावल्यानं केसांना आवश्यक प्रथिनं मिळतात.केसांना मध लावल्यानं केस मऊ होतात.एरंडेल तेलानं केस मजबूत होतात आणि केसांना चमक येते. 

केस निरोगी राहाण्यासाठी केसांची देखभाल करणं, केसांची काळजी घेणं आवश्यक आहे. पण रोजच्या घाईगडबडीत केसांची आवश्यक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा परिणाम केसांवर होतो. उन्हाळ्यात जर केसांकडे दुर्लक्ष झालं तर केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. केस खराब होवून गळायला लागतात.  केसांच्या समस्यांचा धोका टाळायचा असल्यास केसांना पोषणाची आवश्यकता असते. केसांना डीप कंडिशनिंग केल्यास केसांच्या समस्या दूर होतात. केसांना हवी असलेली चमक मिळते. पण् पार्लरमध्ये किंवा हेअर क्लिनिकमध्ये डीप कंडिशनिंगची ट्रीटमेण्ट महागडी असते. पण घरच्याघरी दही, मध, शिया बटर, कोरफड, एरंडेल तेल  याद्वारे केसांना डीप कंडिशनिंग करुन केसांना आवश्यक पोषण देता येतं. घरच्या घरी डीप कंडिशनिंगचे उपाय करणं सोपं आहे. 

Image: Google

1. दही

दह्यानं केसांचं डीप कंडिशनिंग करण्यासाठी केस आधी स्वच्छ धुवावेत.  केस वाळल्यानंतर एका वाटीत दही घ्यावं. केसांच्या मुळांपासून केसाच्या टोकापर्यंत  हलका मसाज करत केसांना दही लावावं. दही लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केस तेलकट असतील तर केसांना दही लावणं हा उत्तम उपाय आहे. दही लावल्यानं केसांना आवश्यक प्रथिनं मिळतात. तेसच केसांतील गुंता निघून जाऊन केसांना मऊपणा येतो.

Image: Google

2. शिया बटर

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना डीप कंडिशनिंग करण्याची गरज आहे. यासाठी केसांना शिया बटर लावावं. शिया बटरने केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करावा. संपूर्ण केसांना शिया बटर लावलं की गरम पाण्यात टाॅवेल बुडवन तो पिळावा आणि गरम् टाॅवेल केसांना बांधावा. एका तासानंतर केस धुवावेत. या उपायानं केसांचा कोरडेपणा निघून जातो. केसांना चमक येते आणि केस सुरक्षित राहातात.

Image: Google

3. कोरफड

त्वचेप्रमाणे कोरफड केसांसाठीही उत्तम असते. कोरफडने केसांचं डीप कंडिशनिंग करण्यासाठी कोरफडच्या पातीतून ताजा गर काढावा. हा गर केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावा. अर्ध्या तासानंतर केस कोमट पाण्यानं धुवावेत. केस चांगले राहाण्यासाठी आठवड्यातून केसांना कोरफडचा गर अवश्य लावावा. या उपायानं केस गळणं थांबतं. केस दाट होतात तसेच केसातल्या कोंड्याची समस्याही दूर होते. 

Image: Google

4.  मध

मध केसांसाठी फायदेशीर असल्यानं मधाचा समावेश हेअर प्रोडक्टसमध्ये केलेला असतो. घरच्याघरी उपायांमध्येही मधाचा उपयोग केसांसाठी करता येतो. यासाठी मध ऑलिव्ह तेल/ खोबऱ्याचं तेल  यामध्ये घालावं. तेलात मध चांगलं मिसळून घ्यावं. हे मिश्रण केसांना लावावं. एक तासानंतर केस कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावेत. या उपायानं केसांना ओलसरपणा मिळून चमक येते.  या उपायानं केस सुंदर दिसतात. 

Image: Google

5. एरंडेल तेल

केसांसाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरतं. एका वाटीत थोडं एरंडेल तेल घ्यावं. एरंडेल तेलानं केसांच्या मुळांशी हलक्या हातानं मसाज करावा. एरंडेल तेल केसांना रात्रभर लावून सकाळी शाम्पूनं केस धुतल्यास त्याचा फायदा होतो. केस  कोमट पाण्याने धुवावेत.  या उपायानं केस मजबूत होतात आणि केसांना चमक येते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी