वय वाढलं की केस पांढरे होणारच. पण कमी वयातच केस पांढरे होतात तेव्हा काय करावं ते समजत नाही. कारणच माहित नसल्यानं काय उपाय करावे हे उमजत नाही. पण कमी वयात केस पांढरे होणं ही केवळ सौंदर्याशी निगडित समस्या नाही. याचा संबंध थेट आरोग्याशी असतो. आणि म्हणूनच कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय समजून घेणं आवश्यक आहे.कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येला कैनिटाइस असं म्हणतात. वय वाढतं तसं शरीरात मेलेनिनचं प्रमाण कमी होत जातं. मेलेनिन हे रंगद्रव्य असून त्याच्यामुळेच त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो. वय वाढलं की मेलेनिनचं निर्मिती घटणं आणि त्याचा परिणाम केस पांढरे होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण जेव्हा कमी वयात केस पांढरे होतात तेव्हा शरीरार्तील पोषक तत्त्वं कमी झालेले असतात किंवा शरीरात लपलेल्या आजाराचंही हे लक्षण असू शकतं.
कमी वयात केस पांढरे का होतात?
- केस लवकर पांढरे होणं ही अनुवांशिक समस्या असते. घरात जर आई- वडील यांच्यापैकी कोणाचे केस लवकर पांढरे झालेले असल्यास तीच समस्या मुलांमधेही निर्माण होऊ शकते.
- प्रथिनांची कमतरता ही खूप मोठी समस्या आहे. प्रथिनं कमी पडले की कमी वयात केस पांढरे होण्यास सुरुवात होते.
- केसांच्या वाढीला आणि केस निरोगी राहाण्यास जीवनसत्त्वं आणि खनिजांची आवश्यकता असते. पण जर ते कमी पडले तर विशेषत: ब १२ या जीवनसत्त्वाच्या कमतरेमुळे केस लवकर पांढरे होतात.
- थायरॉईड कमी झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. या कारणानेही केस लवकर पांढरे होतात. थायरॉइड ग्रंथीतून थायरॉइड कमी स्त्रवायला लागलं की ही समस्या निर्माण होते.
- डाउन सिंड्रोम हा अनुवांशिक आजार आहे. या आजाराचा परिणाम, चेहेरा, नाक, मान यांच्या आकारावर होतो तसच तो केसांवरही होतो आणि केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते.
- वर्नर सिंड्रोम या आजारामुळेही त्वचेचा रंग बदलतो. अकाली वृध्दत्त्व येते. आणि केस पांढरे होतात.
- प्रदुषणामुळेही केस लवकर पांढरे होतात. ज्या भागात वायू प्रदूषण जास्त आहे तेथे राहाणाऱ्या लोकांचे केस लवकर पांढरे झालेले आढळतं. धूम्रपान करण्याची सवय असल्यास त्याचाही परिणाम केस पांढरे होण्यावर होतो.
- वेगवेगळ्या संशोधनातून आणि अभ्यासातून हे सिध्द झालं आहे की मानसिक ताण तणाव असले की डोक्यावरचे केस लवकर पांढरे होतात. कारण तणावामुळे कॉर्टीसॉल आणि अॅण्ड्रेनालाइन हे हार्मोन्स जास्त स्त्रवतात आणि त्याचा परिणाम मेलानिन या घटकावर होतो आणि केस पांढरे होतात.
- मलेरिया आजारावर घेतलेले औषधं तसेच मानसिक विकारांवरील औषधांचं सेवन यामुळेही केस लवकर पांढरे होतात.
यावर उपाय काय?
- लोह, सेलेनियम , फॉस्फरस ही पोषक मुल्यं ज्या अन्नघटकांतून मिळतात, त्यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. आहारात हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळं यांचा समावेश करावा. शरीराला आहारातून पोषक तत्त्वं मिळाली की रंगद्रव्यावरही सकारात्मक परिणाम होतो. आणि केस लवकर पांढरे होण्यास प्रतिरोध होतो.
- आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास त्याचा परिणाम केसांवर दिसू शकतो.
- रोज शाम्पू केल्यानं केस खराब होतात. आठवड्यातून दोनदा केसांना शाम्पू लावणं योग्य मानलं जातं.
- आठवड्यातून दोनदा खोबरेल तेलानं केसांना मसाज करावा.
- केसांवर रासायनिक घटकांचा वापर करु नये.
तेलाचे उपाय
विविध प्रकारच्या तेलात केसांचं पोषण करणारे घटक असतात. अशा तेलांच्या उपयोग औषध स्वरुपात केल्यास केस पांढरे होण्याचे थांबतात.
- मोहरीचं तेल- मोहरीच्या तेलात झिंक, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि सेलेनियम हे महत्त्वाचे घटक असतात. तर एरंड्याच्या तेलात या त्प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. हे तेल एकत्र करुन लावल्यास केसांना पोषक घटक मिळतात. केस मजबूत होतात आणि ते मऊ राहातात.
- तिळाचं तेल आणि गाजराचा रस एकत्र करुन लावल्यास केस काळे होतात. तिळाचं तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करतं . शिवाय केसांचा रंग गडद करण्याची क्षमताही तीळ तेलात असते.
- पूर्वीपासून कांद्याचं बी अर्थात कलौंजीचा वापर केसांची निगा राखण्यासाठी केला जातो. कलौंजी आणि जैतून तेल एक त्र करुन वापरल्यास केस काळे होतात शिवाय केसांचं पोषण होतं आणि केस चमकदार राहातात.
- खोबरेल तेलात मेंदी मिसळून हा पॅक केसांना लावल्यास त्याचा फायदा होतो. खोबरेल तेल केसांच्या मुळापर्यंत जातं. आणि त्यात मेंदी टाकलेली असल्यास ही मेंदीही केसांच्या मुळापर्यंत पोहोचते. त्याचा परिणाम पांढऱ्या झालेल्या केसांवर होतो.