Join us  

केस पांढरे व्हायला लागलेत? 5 घरगुती उपाय, केस राहतील काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:21 AM

कमी वयातच पांढऱ्या केसांमुळे वयस्कर दिसत असाल तर करा हे उपाय...

ठळक मुद्देपारंपरिक उपाय किंवा आयुर्वेदीक पदार्थांचा केस काळे होण्यासाठी होतो उपयोग तेल लावण्याबरोबरच, हेअर मास्क आणि आहारातही काही गोष्टी जाणे गरजेचे

तरुण वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण सध्या वेगाने वाढल्याचे दिसते. कधी कामाचा ताण म्हणून तर कधी आहारातून पोषण मिळत नसल्याने तर कधी आनुवंशिकता अशा एक ना अनेक कारणांनी पांढऱ्या केसांची समस्या उद्भवते. एकदा हे केस पांढरे झाले की सगळे आपल्याला म्हातारी म्हणून चिडवायला लागतात. मग या केसांना मेहंदी लावणे, कलर करणे असे काही ना काही उपाय केले जातात. पण या उपायांनी केसांचा पोत खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी वयातच केस पांढरे झाल्यामुळे आपण तणावात येतो आणि या केसांचे प्रमाण वाढायला लागले की मग काय करायचे आपल्याला काहीही सुचत नाही. पण केसांवर केमिकलचा मारा करुन ते खराब करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी या समस्येवर मात करता आली तर....डॉक्टर दिक्षा इन्स्टाग्रामवर भरपूर अॅक्टीव्ह असून त्या आपल्या फॉलोअर्सना आयुर्वेदाशी निगडीच सतत काही ना काही टिप्स देत असतात. नुकत्याच त्यांनी या पांढऱ्या केसांवरील उपाय सांगून फॉलोअर्सना खूश केले आहे. पाहूयात पांढऱ्या केसांवरील घरगुती उपाय....

१. पित्त नियंत्रणात ठेवा

शरीरात पित्तदोष असेल तर केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. आता पित्त होण्याची साधारण कारणे आपल्याला माहित आहेत. जागरण, जेवणाच्या चुकीच्या वेळा, जंक फूड, मसालेदार पदार्थ खाणे, व्यसने, सतत चहा-कॉफीचे सेवन अशा अनेक कारणांनी पित्त होऊ शकते. त्यामुळे पित्त नियंत्रणात ठेवल्यास केस पांढरे होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. 

२. रोज एक फळ खा

फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित आहे. दिवसातून तुम्ही कोणतेही एक फळ खाल्ले तर तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता. फळांमुळे मेटाबॉलिझम चांगला राहण्यास मदत होते तसेच फळांमध्ये फायबर असल्याने शरीर डिट़ॉक्स व्हायला मदत होते. त्यामुळे न चुकता फळे खाणे संपूर्ण तब्येतीबरोबरच केसांसाठीही चांगले असते. 

३. आवळ्याचा वापर करा 

आवळा आहारात घेण्यासाठी ज्याप्रमाणे चांगला असतो त्याचप्रमाणे केसांसाठीही आवळा अतिशय उपयुक्त असतो. आवळ्याच्या रसात खोबरेल तेल घालून त्याने केसांच्या मूळांना मसाज करा. यामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचू शकतात. इतकेच नाही तर पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तरी त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपण आवळ्याचा हेअर मास्कही तयार करुन तो केसांना लावू शकतो. त्याचाही चांगला फायदा होऊ शकतो. केसांना आवळा लावण्याबरोबरच दररोज न चुकता आहारात आवळ्याचा समावेश केल्यास त्याचाही फायदा होतो. 

४. ब्राम्ही तेल उपयुक्त

ताण हे केस पांढरे होण्यामागचे एक प्रमुख कारण असते. सध्या आपल्याला कामाचा, कौटुंबिक, नात्यांतील, सामाजिक असे अनेक प्रकारच्या ताणांना सामोरे जावे लागते. त्याचा आपल्या केसांवर परिणाम होऊन ते पांढरे होतात. अशावेळी ब्राम्ही तेल उत्तम उपाय ठरु शकते. तणाव घालवण्यासाठी ब्राम्ही हा एक उत्तम उपाय आहे. तणावामुळे केसांचा नैसर्गिक रंग जाऊन केस पांढरे झाले असल्यास ते पुन्हा पहिल्यासारखे होण्यासाठी ब्राम्ही तेलने मूळांना मसाज केल्यास उपयोग होतो. तसेच ब्राम्हीच्या पावडरचा हेअरमास्क करुनही तुम्ही तो केसांना लावू शकता. 

५. कडीपत्ता तेल वापरा

खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने घालून ते चांगले उकळावे. यामध्ये तुम्ही आवळाही घालू शकता. कडीपत्त्याच्या पानांचा रंग गडद होईपर्यंत हे असेच उकळत ठेवावे. हे तेल गार झाल्यावर एका बाटलीत भरुन ठेवा आणि केसांच्या मूळांशी आणि केसांना या तेलाने चांगला मसाज करा. रात्रभर केसांना तेल तसेच ठेऊन दुसऱ्या दिवशी एखाद्या हलक्या शाम्पूने केस धुवून टाका.  

६. तीळाचा वापर करा

केसांना मसाज करण्यासाठी तीळाचे तेल अतिशय उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात तीळाच्या तेलाचा आवर्जून उपयोग केला जातो. पांढरे केस कमी करण्यासाठी केसाच्या मूळांना तीळाच्या तेलाचा मसाज अतिशय उपयुक्त ठरतो. तसेच तीळ भाजून किंवा आहारातून घेतल्यास त्याचाही चांगला फायदा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर मूठभर काळे तीळ खाऊन त्यावर पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा तरी अशाप्रकारे तीळ खाणे चांगले. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीइन्स्टाग्राम