Fenugreek For Hair : आजकाल कमी वयातच अनेकांना केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. यात केसगळती, केसात कोंडा होणे आणि केस पांढरे होणे यांचा मुख्यपणे समावेश आहे. अशात अनेकांना हे माहीतच नसतं की, या महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनीही या समस्या दूर करता येतात. भारतीय खाद्य पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्यांना फार महत्व आहे. मेथीच्या दाण्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. या दाण्यांनी केसांसंबंधी अनेक समस्याही झटक्यात दूर होऊ शकतात. त्यासाठी मेथीचा वापर कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोंडा होईल दूर
कोंड्याची समस्या केसांसाठी फार नुकसानकारक असते. कोंड्यामुळे केस आणखी कमजोर होतात. कोंड्याची समस्या मेथीच्या दाण्यांनी लगेच दूर केली जाऊ शकते. रात्री मेथीचे दाणे भीजू घाला आणि सकाळी त्या दाण्यांची पेस्ट तयार करा, ही पेस्ट दह्यामध्ये मिश्रित करुन केसांवर लावा. काही वेळाने केस धुवून घ्या.
मजबूत-दाट होतील केस
केस जर मुळापासून मजबूत नसतील तर लगेच गळू लागतात. अशात केस मजबूत करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. मेथीचे दाणे चांगल्याप्रकारे बारीक करून पावडर तयार करा आणि कोमट केलेल्या खोबऱ्याच्या तेलात टाका. हे मिश्रण केसांना लावा आणि थोडावेळ ते तसंच ठेवा. काही वेळाने केस धुवून घ्या.
केसगळतीही थांबेल
मेथीच्या दाण्यांच्या सेवनाने केसगळती रोखली जाऊ शकते. मेथीमध्ये प्रोटीन, लेसीथीनरी आणि निकोटिनिक अॅसिड आढळतं, जे केस मजबूत करतं. केसगळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भीजू घाला आणि सकाळी त्या पाण्याने केस धुवा. केस कोरडे झाल्यानंतर पुन्हा पाण्याने धुवा. हा उपाय नियमितपणे केल्यास लगेच फायदा दिसेल.
चमकदार केसांसाठी
केस चमकदार करण्यासाठी मेथीचे दाणे फार फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यांची पावडर तयार करून त्यात नारळाचं दूध टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून काही वेळासाठी तशीच ठेवा. पेस्ट जेव्हा चांगल्याप्रकारे कोरडी होईल तेव्हा केस शाम्पूने धुवून घ्या.