Join us  

Happy Holi 2022 : रंग तर तुफान खेळला, पण चेहऱ्यावरचा रंग काढणार कसा? 4 सोप्या टिप्स, रंग उतरेल झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 1:10 PM

Happy Holi 2022 : रंगपंचमीला खेळलेला रंग पुढे कित्येक दिवस घासला तरी निघत नाही आणि मग ऑफीसला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला ओशाळल्यासारखे होते. तर हा रंग काढण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय पाहूया....

ठळक मुद्देमध आणि लिंबाचा रस एकत्र करुन तो चेहऱ्याला लावला तरीही न निघणारा चेहऱ्याचा रंग निघण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. एखाद्या वस्तूने शरीराची किंवा चेहऱ्याची त्वचा घासली तर त्वचा खराब होईल.

रंगपंचमी, होळी, धूळवड म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात अतिशय उत्साहात खेळले जाणारे सण (Happy Holi 2022). पाणी, रंग, माती यांमध्ये मनसोक्त खेळण्याचा आणि एकमेकांना रंग लावण्याचा हा सण. अनेकदा चेहऱ्याचा रंग निघणार नाही, त्वचेला रंगांचा त्रास होईल, केस खराब होतील म्हणून आपण रंग लावायला घाबरतो. कोणी आपल्याला रंग लावायला आले की नकार देतो. पण असं काहीही केलं तरी आपले मित्रमंडळी नाहीतर घरातील व्यक्ती आपल्याला रंग लावतातच (Holi Celebration ). आता एकदा रंग लावला की आपण काहीच करु शकत नाही. बर हा एकच रंग असेल तर ठिक पण वेगवेगळ्या शेडचे रंग असतील तर मात्र चेहरा आणि त्वचा आणखीच खराब होते. सध्या बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये (Rangpanchami Celebration) कशाप्रकारचे केमिकल वापरलेले असते सांगता येत नाही. त्यामुळे त्या रंगांचा त्वचेला त्रासही होऊ शकतो. रंगपंचमीला खेळलेला रंग पुढे कित्येक दिवस घासला तरी निघत नाही आणि मग ऑफीसला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला ओशाळल्यासारखे होते. तर हा रंग काढण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय पाहूया....

(Image : Google)

१. आपले रंग खेळण्याचे नियोजन असेल तर खेळायला जातानाच अंगाला, चेहऱ्याला आणि केसांना तेल लावून जा. अंगाला तेल लावणे आवडत नसेल तर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझरही लावू शकता. याच्या चिकटपणामुळे त्वचेवर एकप्रकारचा थर तयार होतो आणि रंग त्वचेमध्ये अडकत नाहीत. नुसत्या पाण्याने किंवा साबणानेही हे रंग लगेच निघून येतात. गरम पाण्यापेक्षा रंग काढण्यासाठी गार पाण्याचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

२. चेहऱ्याला एकावर एक रंगांचे थर लावले असतील तर आधी हे रंग पाण्यानेच स्वच्छ धुवायला हवेत. आधीच साबण लावला तर रंग म्हणावे तितके नीट निघत नाहीत. त्यामुळे आधी साध्या पाण्याने हे रंग काढण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर साबणाचा वापर करा. 

३. चेहऱ्याचे रंग काढण्यासाठी चेहरा कशानेतरी घासू नका. त्यामुळे त्वचा खराब व्हायची शक्यता असते. त्याऐवजी तुम्ही नियमित वापरत असलेले एखादे स्क्रबर आवर्जून वापरा. त्या स्क्रबरने चेहार दिवसातून दोन ते तीन वेळा हळूवार धुतल्यास हळूहळू रंग निघण्यास मदत होईल. पण एखाद्या वस्तूने शरीराची किंवा चेहऱ्याची त्वचा घासली तर त्वचा खराब होईल.

(Image : Google)

४. रंग खेळून झाल्यावर आणि आंघोळ झाल्यावर चेहऱ्याला मुलतानी मातीचा किंवा घरगुती एखादा फेसपॅक करुन लावा. त्यामुळे त्वचेच्या आतल्या थरात गेलेला रंग निघण्यास मदत होईल. यामध्ये कोरफडीचा गर आणि मध यांचाही फेसपॅक तुम्ही नक्की लावू शकता. मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन तो चेहऱ्याला लावला तरीही न निघणारा चेहऱ्याचा रंग निघण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोळी 2022त्वचेची काळजी