Lokmat Sakhi >Beauty > थर्टीफस्टच्या पार्टीत स्पेशल दिसायचं आहे? घरच्याघरी करता येतील असे 3 फेशियल , हो जा फ्रेश

थर्टीफस्टच्या पार्टीत स्पेशल दिसायचं आहे? घरच्याघरी करता येतील असे 3 फेशियल , हो जा फ्रेश

31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या निमित्ताने चेहऱ्यासाठी काही खास करावं लागेल. पण काही खास करायचं म्हणजे मग पार्लरमधे जाऊन फेशियल करायला हवं. पण पार्लरमधली गर्दी पाहाता नंबर लागेल कधी आणि फेशियल होईल कधी अशी परिस्थिती. पण म्हणून फेशियल करायचं कॅन्सल करण्याची गरज नाही. घरातल्या घरात आपल्या हातानंही छान फेशियल करता येतं. ते कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:42 PM2021-12-29T12:42:12+5:302021-12-30T17:50:02+5:30

31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या निमित्ताने चेहऱ्यासाठी काही खास करावं लागेल. पण काही खास करायचं म्हणजे मग पार्लरमधे जाऊन फेशियल करायला हवं. पण पार्लरमधली गर्दी पाहाता नंबर लागेल कधी आणि फेशियल होईल कधी अशी परिस्थिती. पण म्हणून फेशियल करायचं कॅन्सल करण्याची गरज नाही. घरातल्या घरात आपल्या हातानंही छान फेशियल करता येतं. ते कसं?

Have a Special Look For Thirty First Party .. Then Give Your Face A Special Treat] with home facial! 3 Ways To Look Special By Facial At Home | थर्टीफस्टच्या पार्टीत स्पेशल दिसायचं आहे? घरच्याघरी करता येतील असे 3 फेशियल , हो जा फ्रेश

थर्टीफस्टच्या पार्टीत स्पेशल दिसायचं आहे? घरच्याघरी करता येतील असे 3 फेशियल , हो जा फ्रेश

Highlightsऋतू बदलतो तशी आपल्या त्वचेची स्थितीही बदलते. यामुळे होणारी त्वचेची हानी भरुन काढण्यासाठी फेशिअल करणं ही गरज आहे.फेशिअल ही लक्झरी नसून आपल्या त्वचेची ती मागणी असते. ती पुरवण्यासाठी आपण घरातल्या घरात नैसर्गिक घटकांचा वापर करुन फेशिअल करु शकतो.घरच्याघरी फेशिअल करताना प्रत्येक स्टेपनंतर टोनर लावणं गरजेचं.. टोनर लावलं नाही तर फेशिअल करुनही चेहऱ्यावर ग्लो येणार नाही. 

31 डिसेंबर जवळ येतोय.. तो कसा साजरा करायचा याचं नियोजन आता जवळ जवळ झालेलंच असेल. बाहेर जाऊन दिलेल्या ऑर्डरची वाट पाहाण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरच्या घरी कुटुंबिय, मित्र, नातेवाईक यांच्या सोबत पार्टी करण्याचं अनेकांनी ठरवलं असेल. पार्टी घरी असू दे किंवा बाहेर 31 डिसेंबर हा दिवस एकदम खास. जुनं जाऊन नवीन येण्याचा आनंद साजरा करायचा असेल तर आपला लूकही खासच हवा ना! नुसतं चालू चालू मेकअपनं काम भागणार नाही. 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या निमित्ताने चेहऱ्यासाठी काही खास करावं लागेल. पण काही खास करायचं म्हणजे मग पार्लरमधे जाऊन फेशिअल करायला हवं. पण पार्लरमधली गर्दी पाहाता नंबर लागेल कधी आणि फेशिअल होईल कधी? अशी परिस्थिती. पण म्हणून फेशिअल करायचं कॅन्सल करण्याची गरज नाही. घरातल्या घरात आपल्या हातानंही छान फेशिअल करता येतं. 

Image: Google

प्रसिध्द कॉस्मेटोलाॅजिस्ट आणि 'अल्यूर सलून स्पा आणि मिस ॲण्ड मिसेस अल्यूर इंडिया'च्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष धनश्री संखे यांनी घरच्याघरी फेशिल करण्याची पध्दत सांगितली आहे.. केवळ एकाच प्रकारचं फेशिअल नाही तर त्वचेप्रमाणे फेशिअल करण्याच्या स्वतंत्र पध्दती सांगताना त्यांनी फेशिअलचा नेमका अर्थ, गरज,  फेशिअल दरम्यान केल्या जाणाऱ्या मसाजचे बारकावे याबाबतही सविस्तर सांगितलं. 

फेशिअल म्हणजे त्वचेची गरज!

फेशिअल खरंतर पार्टीसाठीच नाही तर आपली त्वचा नीट ठेवण्यासाठी गरजेचं असतं. आपल्या त्वचेला प्रत्येक ऋतुनुसार पॅम्परिंग ( लाड ) करण्याची गरज असते. थंडी , उन्हाळा, पावसाळा या ऋतूत आपल्या त्वचेची गरज बघून पॅम्परिंग आणि पोषण करण्याची गरज असते. ऋतू बदलतो तशी आपल्या त्वचेची स्थितीही बदलते. यामुळे होणारी त्वचेची हानी भरुन काढण्यासाठी फेशिअल करणं ही गरज आहे. फेशिअल ही लक्झरी नसून आपल्या त्वचेची ती मागणी असते. ती पुरवण्यासाठी आपण घरातल्या घरात नैसर्गिक घटकांचा वापर करुन फेशिअल करु शकतो. त्वचेचे लाड करणं, खराब झालेल्या त्वचेवर इलाज करणं हे घरच्याघरी फेशिअल करुनही शक्य आहे. 

Image: Google

घरच्याघरी फेशिअल

घरच्याघरी फेशिअल करणं ही खरंतर आरामदायक बाब आहे. आपल्या सोयीची वेळ बघून आपण करु शकतो. घरच्याघरी फेशिअल करुनही आपण खराब झालेली त्वचा दुरुस्त करु शकतो, त्वचा टवटवीत आणि ती पुर्नज्जिवितही करु शकतो. घरच्याघरी फेशिअल करताना त्वचेला डीप क्लीन्जिंगची अर्थात खोलवर स्वच्छतेची गरज असते. त्वचा खोलवर स्वच्छ झाली तरच फेशिअलद्वारे हवा असलेला ग्लो चेहऱ्यावर येतो. आपल्या स्वयंपाकघरात अशा गोष्टी आहेत ज्याद्वारे त्वचा खोलवर स्वच्छ होवू शकते आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी चेहऱ्यावर हवा तसा ग्लो आणता येतो. त्वचेला आवश्यक ते पोषण मिळू शकतं. 

Image: Google

31 डिसेंबर म्हणजे थंडीचा काळ. या काळात त्वचा कोरडी पडते. त्वचा जास्त कोरडी झाली की ती संवेदनशील होते. पण त्वचा पातळ असणं म्हणजे संवेदनशील नाही. तर कोणतंही ब्यूटी प्रोडक्टस वापरल्यानं त्वचेला खाज येणं, पुरळ उठणं आणि चुणचुणणं. बाहेरच्या कोणत्याच गोष्टी सहन न होणं म्हणजे त्वचा संवेदनशील आहे असं म्हणावं. घराच्या घरी फेशिअल करताना आपली त्वचा नेमकी कशी आहे हे ओळखणं गरजेचं आहे. पण त्वचा अती कोरडी पडली तर त्वचेची संवेदनशिलता वाढते. थंडीत वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा खूप कोरडी पडत असेल तर संवेदनशील त्वचेसाठीचं फेशिलही कोरडी त्वचा असणारे करु शकतात.

Image: Google

कोरड्या- संवेदनशील त्वचेसाठी फेशिअल

कोरडी त्वचा असलेल्यांनी फेशिअलच्या पहिल्या पायरीसाठी अर्थात डीप क्लीन्जिंगसाठी मेडिकलमधे मिळणारं बेबी लोशन वापरावं. यासाठी 2 लहान चमचे बेबी लोशन, 2 मोठे चमचे ग्लिसरीन आणि 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल घालावं. ते नीट मिसळावं. हे नीट मिसळण्यासाठी फूड प्रोसेसरमधे ब्लेण्ड केलं तरी चालतं. यातून दाट, क्रीमी पेस्ट तयार होईल. कोरडी आणि संवेदनशील त्वचेसाठी हा उत्तम क्लीन्जर आहे. या पेस्टनं चेहरा स्वच्छ केला की मग चेहऱ्यावर टोनर लावावं. कारण् क्लीन्जिंग झाल्यावर चेहऱ्याच्या त्वचेवरची रंध्रं पूर्ण उघडतात. ती बंद करण्यासाठी         ( पूर्ण नाही) पण त्यांचं संतुलन राखण्यासाठी टोनरची गरज असते. टोनरमुळे त्वचेची पीएच लेव्हल अर्थात त्वचेतला ओलावा राखण्यासाठी टोनर लावावं. ते बाहेरुन आणण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेलं गुलाब पाणी हे उत्तम टोनर आहे. गुलाब पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्याला गुलाब पाणी लावावं. यामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेची रंध्रं आवश्यक तेवढी बंद होतात. 

टोनर लावून् झाल्यानंतर गरज असते ती स्क्रब करण्याची. यासाठी 2 मोठे चमचे ओटस पावडर घेतली तर 1 चमचा मध आणि थोडं गुलाब पाणी घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. ती 5-7 मिनिटं चेहऱ्यावर तशीच ठेवावी. नंतर चेहऱ्यावर गोलाकार मसाज करत काढावा. कोरडी त्वचा असली तरी या त्वचेवर मुरुम पुटकुळ्या असतात, ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस असतात. त्यासाठी वाफ घेणं गरजेचं. घरी स्टीमर नसेल तर एका खोलगट भांड्यात गरम पाणी घ्यावं. मऊ रुमाल घ्यावा. तो गरम पाण्यात बुडवून थोडासा पिळून मग आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा. यामुळे त्वचेची रंध्रं पुन्हा उघडतात आणि त्यामुळे त्वचेचं डीप क्लीन्जिंगही होतं.

स्क्रब नंतर वाफ घेतल्याने त्वचेखालचा रक्तप्रवाह सुधारतो. यानंतर पुन्हा गुलाब पाण्यानं चेहऱ्याला टोनिंग करावं. घरी फेशिअल करताना प्रत्येक स्टेप नंतर टोनर वापरावं. कारण यामुळे त्वचेत ओलावा राखला जातो. तो राखला गेला तर त्वचा ग्लोई होते, चमकदार होते. जर प्रत्येक स्टेपनंतर टोनर वापरलं नाही तर फेशिअल करुनही ग्लोइंग स्कीन मिळणार नाही. टोनर म्हणजे त्वचेचा उत्तम मित्र.  

यानंतर त्वचेला मसाज करावा. यासाठी एक पिकलेलं केळ घ्यावं. ते कुस्करावं. त्यात इ जीवनसत्त्वाची कप्सूल घालावी. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा. पार्टीसाठी त्वचा विशेष चमकदार होण्यासाठी तर त्यात स्ट्रॉबेरी आणि अंड्याचा थोडा पांढरा बलक घालावा. ते चांगलं मिसळून त्याने चेहऱ्यावर मसाज करावा. स्ट्रॉबेरीमुळे त्वचा पुर्नज्जिवीत होते. या मिश्रणानं चेहऱ्यावर हळुवार मसाज करावा. याला सूदिंग मसाज असं म्हणतात. जो केवळ बोटाच्या सहाय्याने करायचा असतो.   मसाज हा नेहमी गोलाकार आणि वरुन खाली करावा. खालून वर करु नये. तर डोळ्यांवर मसाज करताना क्लॉकवाइज आणि ॲण्टिक्लॉकवाइज करावा. हा मसाज 7-8 मिनिटं न थांबता करावा.

Image: Google

घरच्या घरी मसाज करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी ,  की हा मसाज हळुवार करावा, बोटांनी करावा आणि मसाज करताना चेहऱ्यावरुन् हात काढू नये. कारण जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा त्वचेखालच्या रक्तप्रवाहाला चालना मिळते. मसाज करताना चेहरा आणि हाताचा संबंध तुटता कामा नये. मसाज करताना चेहऱ्यावर हात काढून घेतला तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मसाज हा न थांबता 7-8 मिनिटं करावा. त्यापेक्षा जास्त वेळ मसाज करु नये. मसाज झाल्यावर चेहरा धुवावा. पुन्हा टोनर लावावं. शेवटी फेस मास्क लावावा. यासाठी 1 मोठा चमचा कच्चं दूध घ्यावं. त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा मध घेऊन ते चांगलं मिसळून त्याची दाटसर पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. 15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्यानं धुवावा. थंडी असली तरी चेहरा धुण्यासाठी गरम पाणी वापरु नये. कारण गरम पाण्यानं चेहरा धुतल्यास चेहरा कोरडा होतो. यानंतर चेहरा रुमालानं टिपून घ्यावा आणि चेहऱ्याला  मॉश्चरायझर लावावं. 

Image: Google

तेलकट त्वचेसाठी फेशिअल

त्वचा खूप तेलकट असेल आणि चेहऱ्यावर जास्त मुरुम पुटकुळ्या असतील तर क्लीन्जर म्हणून 1मोठा चमचा दही घ्यावं, त्यात थोडं अंडयाचा पांढरा बलक घालावा आणि थोडी ओटस पावडर घालावी. हे सर्व नीट एकत्र करुन त्याची पेस्ट करावी आणि ती क्लीन्जर म्हणून वापरावी. या क्लीन्जरमुळे त्वचेवरील जास्तीचं तेल शोषलं जातं. त्वचेवर जर मुरुम पुटकुळ्या नसतील , पण त्वचा तेलकट असेल तर मसूर डाळ अर्धा तास किंवा रात्रभर दुधात भिजवावी. ही डाळ मिक्सरमधे वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात थोडं मध घालावं. हे झालं तेलकट त्वचेसाठीचं स्क्रबर. चेहरा स्क्रब झाल्यानंतर मग चेहरा धुवून चेहऱ्याला टोनर लावावं. 

 तेलकट त्वचेसाठी टोनर घरी करता येतं. यासाठी गवती चहा घ्यावा. तो कपभर पाण्यात 15-20 मिनिटं उकळून घ्यावा. नंतर हे पाणी थंड होवू द्यावं. थोडा वेळ फ्रीजमधे ठेवावं. गवती चहामुळे त्वचेवरील दूषित घटक ज्यामुळे त्वचेवर मुरुम पुटकुळ्या येतात ते  नियंत्रणात येतात. टोनर लावून झालं की मग गरम पाण्याचा रुमाल चेहऱ्यावर ठेवून् वाफ घ्यावी. वाफ घेऊन झाल्यानंतर मसाज करवा.

 Image: Google

तेलकट त्वचेवर कोरफड जेलनं मसाज करावा. तेलकट त्वचेसाठी जेलयुक्त घटक वापरणं आवश्यक आहे. चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर या कोरफड जेलमधे 2 छोटे चमचे दालचिनीचं पाणी घालावं. ते मिसळून त्याने मसाज करावा. दालचिनीचे दोन तीन तुकडे घेऊन ते पाण्यात चांगले उकळावेत आणि असं दालचिनीची पाणी वापरावं. पण जर मुरुम पुटकुळ्या नसतील तर तेलकट त्वचेसाठी चांगल्या प्रतीचं कोरफड जेल् वापरुन मसाज करावा. मसाज झाल्यानंतर पुन्हा गवती चहाचा टोनर वापरावा. आणि शेवटी फेस पॅक लावावा. यासाठी थोडं डाळीचं पीठ , थोडी ओटमील पावडर आणि ग्लोइंग त्वचेसाठी स्ट्रॉबेरी घालून् ते चांगलं मिसळून त्याचा लेप करावा आणि तो चेहऱ्याला लावावा. 15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्यानं धुवावा. 

लेप काढताना कधीही मसाज करुन काढू नये. कारण आपण मसाज करताना आपण जे घटक वापरलेले असतात त्या घटकातील तत्त्वं त्वचेमधे खोलवर रुजवण्यासाठी म्हणून  शेवटी फेस पॅक लावला जातो. या पॅकनं त्वचेवरची रंध्रं बंद होतात. त्वचा मऊ होते. 

Image: Google

फास्ट ग्लो पार्टी मास्क

एखाद्या कार्यक्रमाला जायचं अचानक ठरलं असेल आणि फेशिअल करण्यास वेळ नसेल् तर फास्ट ग्लो पार्टी मास्क घरी तयार करुन लावावा. यामुळेही चेहऱ्यावर ग्लो येतो. हा मास्क सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चालतो. दहा मिनिटात चेहरा छान करणारा हा मास्क तयार करण्यासाठी आधी काकडीचे पातळ काप करावेत. एक कप पाण्यात थोडी चहा पावडर टाकून काळा चहा करावा. हा चहा 5-7 मिनिटं उकळावा. तो झाला की तो गाळून घ्यावा.  हे चहाचं पाणी थोडं गार होवू द्यावं. मग त्यात एक छोटा चमचा मध घालावं. नंतर या पाण्यात काकडीचे काप 10-15 मिनिटं बुडवून ठेवावेत. मग हे काप संपूर्ण चेहऱ्यावर 15-20 मिनिटं ठेवावेत. तोपर्यंत डोळे मिटून पडून् राहावं. चहा पावडरमधे टॅनिन असतं. यामुळे चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. त्वचा मऊ होते. ताजी तवानी होते.

- धनश्री संखे

(प्रसिध्द कॉस्मेटोलाॅजिस्ट आणि 'अल्यूर सलून स्पा आणि मिस ॲण्ड मिसेस अल्यूर इंडिया'च्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष)

 

 

Web Title: Have a Special Look For Thirty First Party .. Then Give Your Face A Special Treat] with home facial! 3 Ways To Look Special By Facial At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.