बटाटा म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात आधी बटाट्याची भाजी येते. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ आवडतात. कोणत्याही भाजीत बटाटा परफेक्ट फिट बसतो. बटाटा खाण्यापुरतीच नाही तर, आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. चेहरा साफ आणि तजेलदार बनवण्यासाठी लागणारे गुणधर्म बटाट्यात आढळुन येतात. कच्च्या बटाट्यातील पोषक तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील डाग, मुरुम, त्वचेच्या संबंधित अन्य समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासह चेहऱ्याला एक नवी चमक देखील मिळते. आज आपण बटाट्याचा वापर फेशियलसाठी कसा करता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.
स्क्रब बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटा
बेसन
तांदळाचं पिठ
गुलाब पाणी
ॲलोवेरा जेल
सर्वप्रथम, बटाट्याला चांगले किसून घ्या. त्यात एक टेबलस्पून बेसन घाला. त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ, गुलाब जल आणि ॲलोवेरा जेल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. आणि चांगले स्क्रब करा. १५ ते २० मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवून टाका.
फेसमास्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटा
दही
ॲलोवेरा जेल
टी ट्री ओईल
बटाटा चांगला मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात दोन चमचे दही टाका. एक चमचा ॲलोवेरा जेल आणि टी ट्री ओईल टाका. आणि हे मिश्रण पुन्हा वाटून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि साधारण २० मिनिटे तसेच ठेऊन द्या. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. चांगल्या रिझल्टसाठी हे मिश्रण महिन्यातून ३ ते ४ वेळा तरी लावावे.