Join us

लिप बाम वापरले असतील, स्क्रब वापरले आहेत का? 4 प्रकारचे स्क्रब- ओठ दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 17:54 IST

उन्हाळ्यात ओठांची घ्या विशेष काळजी.. लाल मऊ ओठांसाठी 4 लिप स्क्रब

ठळक मुद्देओठ मऊ आणि नैसर्गिकरित्या गुलाबी होण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचं स्क्रब फायदेशीर असतं.ओठांवरची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी ब्राउन शुगर स्क्रब फायदेशीर ठरतं.ओठांचा काळपटपणा जाण्यासाठी संत्र्याच्या सालाचा उपयोग करता येतो. 

कडक उन्हाचा शरीरावर, त्वचेवर परिणाम होतो. त्वचा काळवंडते. कोरडी पडते. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तशीच काळजी ओठांचीही घ्यावी लागते. हिवाळ्यात ओठ फाटतात म्हणून ओठांवर लिप बाम, लिप ऑइल लावणं यासारखे उपाय करावे लागतात. पण उन्हाळ्यात कडक उन्हाचा परिणाम ओठांवर होवून ओठ काळे पडतात. तसेच या दिवसात दिवसभर ओठांवर लिपस्टिक असल्यास त्याचा परिणाम होवून ओठ खराब होतात. त्यामुळे उन्हाळ्यातही ओठांची काळजी घेणं आवश्यक आहे. घरच्याघरी 4 प्रकारचे लिप स्क्रब तयार करुन ओठांची काळजी घेता येते. 

Image: Google

रोज पेटल्स स्क्रब

रोज पेटल्स स्क्रब करण्यासाठी एका वाटीत 3 चमचे दूध घ्यावं. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात. दुधात पाकळ्या कुस्करुन घ्याव्यात. हे मिश्रण ओठांवर हलका मसाज करत लावावं. थोडा वेळ ते ओठांवर राहू द्यावं नंतर ओठ कोमट पाण्यानं धुवावेत. या उपायानं ओठ मऊ आणि गुलाबी होतात. 

Image: Google

ऑरेंज पील स्क्रब

एका वाटीत 2 चमचे संत्र्याच्या सालाची पावडर, 2 चमचे ब्राउन शुगर, 4-5 थेंब बदामाचं तेल घ्यावं. ते चांगलं एकत्र करावं. या मिश्रणानं अर्धा तास हलक्या हातानं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर टिश्यू पेपरनं किंवा मऊ कपड्यानं ओठ स्वच्छ पुसावेत. या उपायानं ओठांचा काळपटपणा निघून जातो.

Image: Google

ब्राऊन शुगर स्क्रब

ओठांवरची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी ब्राउन शुगर स्क्रब फायदेशीर ठरतं. यासाठी मध घ्यावं. त्यात इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घालावेत. दोन्ही चांगलं मिसळल्या नंतर त्यात ब्राऊन शुगर घालावी. या मिश्रणानं ओठांवर हलक्या हातानं मसाज करावा. नंतर ओठ पाण्यानं स्वच्छ धुवावेत. ओठ रुमालानं टिपल्यानंतर त्यावर लिप बाम लावावा.

Image: Google

काॅफी लिप स्क्रब

उन्हाळ्यात छान गार वाटावं यासाठी आपण कोल्ड काॅफी पितो. काॅफीचा उपयोग उन्हाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी करता येतो. काॅफी लिप स्क्रब तयार करण्यासाठी काॅफी पावडर, ओबडधोबड वाटलेली साखर आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. या पेस्टनं थोड्या वेळ ओठांना मसाज करावा. नंतर ओठ पाण्यानं स्वच्छ धुवावेत.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सओठांची काळजीहोम रेमेडी