Join us  

केसांसाठी मेहंदी उत्तमच; पण लावताना हे 6 नियम विसरु नका; पध्दत चुकली, केसांचं वाटोळं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 5:58 PM

मेहंदी ही केसांसाठी कंडिशनिंग आणि कलरिंग असं दोन्ही काम करते. पण चुकीच्या पध्दतीनं मेहंदी लावल्यामुळे मात्र केसांचं नुकसान होतं. केस कोरडे होतात. असं होवू नये म्हणून केसांना मेहंदी लावताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.

ठळक मुद्देपाच सहा तास केसांना मेहंदी लावून ठेवणं किंवा रात्री मेहंदी लावून रात्रभर ती केसांवर ठेवणं यामुळे केसांना लाभ नाही तर केसांचं नुकसान होतं. मेहंदी लावल्यानं केसांना आलेला कोरडेपणा घालवण्यासाठी केळ हे उपयुक्त ठरतं.मेहंदी धुतल्यानंतर केस थोडे वाळू द्यावेत. आणि ते थोडेसे ओलसर असतानाच केसांना तेल लावावं.

 फक्त वय झाल्यावरच केस पांढरे होतात असं नाही. वेगवेगळ्या कारणांनी अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पांढरे केस सौंदर्यात अडथळा निर्माण करतात. यावर उपाय म्हणून केस डाय करणे, कलर करणे , केसांना मेहंदी लावणे असे उपाय केले जातात. डाय आणि कलर यापेक्षा केसाना मेहंदी लावणं हा सुरक्षित पर्याय आहे. मेहंदी लावल्याने केस सुरक्षित राहातात, पांढर्‍या केसांची समस्या मिटते आणि केस सुंदर दिसतात.मेहंदी ही केसांसाठी कंडिशनिंग आणि कलरिंग असं दोन्ही काम करते. पण चुकीच्या पध्दतीनं मेहंदी लावल्यामुळे मात्र केसांचं नुकसान होतं. केस कोरडे होतात. असं होवू नये म्हणून केसांना मेहंदी लावताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.

केसांना मेहंदी लावताना..

छायाचित्र- गुगल

1. मेहंदी किती वेळ लावावी याला खूप महत्त्व आहे. खूप वेळ केसांना मेहंदी लावल्याने केस चांगले रंगतात असं अनेकांना वाटतं. त्यामुळे पाच सहा तास केसांना मेहंदी लावून ठेवणं किंवा रात्री मेहंदी लावून रात्रभर ती केसांवर ठेवणं यामुळे केसांना लाभ नाही तर केसांचं नुकसान होतं. तज्ज्ञ सांगतात की मेहंदी जर केस रंगवण्यासाठी लावली असेल तर ती फक्त दिड तास ठेवावी आणि जर केस कंडिशनिंग करण्यासठी मेहंदी लावली असेल तर ती पाऊण तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नये.

2. मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होण्याची समस्या असते. केस कोरडे होवू नये म्हणून मेहंदी भिजवताना त्यात थोडं ऑलिव ऑइल घालावं. आणि कंडिशनिंग करण्यासाठी मेहंदी लावत असाल तर त्यात थोडं दही घालावं. यामुळे केसांना चमक येते. तसेच मेहंदी धुतल्यानंतर केस थोडे वाळू द्यावेत. आणि ते थोडेसे ओलसर असतानाच केसांना तेल लावावं.

3. मेहंदीमुळे केस कोरडे झाले असल्यास केसांना एक पॅक लावावा. यासाठी एक चमचा ऑलिव तेल घ्यावं. त्यात दोन मोठे चमचे दही घालावं, थोडा लिंबाचा रस घालावा. मिश्रण चांगलं घोटून एकजीव करावं. हा पॅक केसांना लावावा आणि वीस मिनिटांनी केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात.

छायाचित्र- गुगल

4. कोरडे केस मऊसूत होण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घ्यावा आणि त्यात ऑलिव तेल, एक चमचा मध, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा व्हिनेगर घालावं. हे मिश्रण संपूर्ण केसांना लावावं. तीस मिनिटांनी केस धुवावेत. यामुळे केस मऊ मुलायम होतात.

5. मेहंदी लावल्यानं केसांना आलेला कोरडेपणा घालवण्यासाठी केळ हे उपयुक्त ठरतं. यासाठी एक केळ कुस्करुन घ्यावं. त्यात थोडा कोरफडीचा गर आणि दोन चमचे कोणतंही केसांचं तेल घालावं. हे मिश्रण चांगलं एकजीव करावं आणि केसांना लावावं. अर्ध्या तासानंतर केस साध्या पाण्यानं धुवावेत. यामुळे केसांना चमक येते आणि केस मऊ होतात.

6. मेहंदीमुळे केस कोरडे होवू नये यासाठी मेहंदी भिजवताना आवळा पावडर, थोडं दही आणि अंडं घालावं. मेहंदीमधे हे चांगलं मिसळून घ्यावं आणि मग केसांना मेहंदी लावावी. यामुळे केस कोरडे होत नाही. आवळा पावडरच्या ऐवजी आवळ्याचं तेल किंवा बदामाचं तेल घालावं.