सकाळी घराबाहेर पडताना परफ्यूम मारणं आता बहुतांश लोकांच्या अंगवळणी पडलं आहे. कॉलेजच्या तरूण- तरूणींपासून ते अगदी वयस्कर आजी- आजोबांपर्यंत सगळेच परफ्यूमचा सर्रास वापर करतात. काही जणं तर आंघोळीनंतर आधी अंगावर डिओ मारतात. त्यानंतर मग घरातून बाहेर पडताना परफ्यूमचा फवारा अंगावर मारला जातो. फ्रेश राहण्यासाठी, दिवसभर सुगंध आजूबाजूला दरवळत रहावा म्हणून निश्चितच परफ्यूम मारा. पण जरा जपून. कारण दररोज अंगावर भसाभस परफ्यूम मारल्यामुळे अनेक आजार जडू शकतात. विशेष म्हणजे या आजारांचा त्रास आपल्याला होत राहतो, पण हा त्रास परफ्यूममुळे होत आहे, हे लक्षात येत नाही.
१. फोड येणेपरफ्यूम आपण कपड्यांवर मारतो पण तो मारताना त्यातील काही सुक्ष्म कण चेहरा, गळा, मान, पाठ या भागावर उडू शकतात. याशिवाय डिओ तर थेट अंगावरच मारला जातो. त्वचेवरच्या घर्मरंध्रात म्हणजे जेथून घामाचे उत्सर्जन होते, त्या जागेत जर हे कण गेले तर घर्मरंध्र बंद होतात. त्यामुळे त्या भागात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जर अनेक उपाय करूनही मान, पाठ, गळा, चेहरा यावरील फोडं, पुरळं कमी होत नसतील, तर तो संसर्ग परफ्यूममुळे झालेला असू शकतो.
२. अस्वस्थताखूप जास्त परफ्यूम मारल्याने सतत अस्वस्थ होऊ शकते. पण बऱ्याचदा आपण का अस्वस्थ आहोत, आपले लक्ष का लागत नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. सगळे काही व्यवस्थित असूनही जर अस्वस्थता कायम वाढलेलीच आहे, असं जाणवत असेल तर परफ्यूम कमी मारण्याचा किंवा अगदीच न मारण्याचा उपाय करून बघा.
३. मळमळ आणि डोकेदुखीपरफ्युम किंवा डिओमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे मळमळण्याचा त्रास जाणवू शकतो. बरेचदा असं होतं की आपल्या समोर आपल्या खोलीत जरी एखाद्या व्यक्तीने खूप परफ्यूम मारला तरी आपल्याला खूप कसंतरी होतं. मळमळल्यासारखं होतं. कधीकधी तर नाक बंद करून घ्यावं लागतं. जर फक्त काही सेकंद तो वास आल्यामुळे त्रास होऊ शकतो, तर असा हेवी परफ्यूम जी व्यक्ती प्रत्यक्ष अंगावर मारते, तिला देखील त्यामुळे त्रास होऊ शकतो. खूप जास्त परफ्यूमचा फवारा अंगावर घेणाऱ्या व्यक्तींना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास छळू शकतो.
४. हार्मोन्सचे संतूलन बिघडू शकतेपरफ्यूम आणि डिओमध्ये पॅराबिन असते. पॅराबिनचा सतत होणारा संपर्क हार्मोनल सिस्टिमवर परिणाम करतो. शरीरातील हार्मोन्सचे संतूलन बिघडले तर अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे परफ्यूम किंवा डियो या दोन्ही गोष्टींचा अतिरेक टाळला पाहिजे.
५. श्वसनाचा त्रासपरफ्यूम आणि डिओमध्ये असे अनेक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाी घातक असतात. असे घटक जर नाक- तोंडावाटे आपल्या शरीरात गेले तर त्यामुळे श्वसन नलिकेसंदर्भात किंवा श्वसन क्रियेसंदर्भात अनेक आजार उद्भवू शकतात. खूप जास्त परफ्यूम मारणाऱ्या व्यक्तींना भविष्यात दमा, अस्थमा असा त्रासही उद्भवू शकतो. ज्या व्यक्तींना कायम सर्दी असते, त्यांच्या सर्दीचे एक कारण परफ्यूमचा अतिवापर हे देखील असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.