Join us  

होम फेशियल: निस्तेज चेहरा चटकन चमकेल; 5 स्टेप्समध्ये घरच्याघरी करा गोल्डन फेशियल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 7:47 PM

Home Facial: घरच्याघरी दूध, हळद, बेसन , मध यांचा वापर करत पार्लरच्या तोडीचं 5 स्टेप्सचं गोल्डन फेशियल करता येणं सहज शक्य आहे. घरच्याघरी त्वचेला सोनेरी तजेला!

ठळक मुद्देक्लीन्जर म्हणून कच्चं दूध आणि हळदीचा वापर करावा.वाफ घेताना पाण्यात कडुलिंबाची पानं घालून पाणी उकळावं.स्टीमनंतर दही, मध आणि बदाम तेलाचा मसाज करणं फायदेशीर असतं. 

घरात किंवा कोणा नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे कार्यक्रम, समारंभ असला की आधी ब्यूटीशियनची वेळ घेऊन फेशियल करावं लागतं. कार्यक्रम छोटा असो की मोठा आपल्या लूकमध्ये कमतरता राहायला नको. कसंतरी आवरलं हा फील नकोसा वाटतो. पण काही कार्यक्रम अगदी ऐनवेळी ठरतात. त्यामुळे कार्यक्रमाची तयारी करावी की आपली असा गोंधळ उडतो. एवढ्य कमी वेळात फेशियलसारख्या परिणामकारक ब्यूटी ट्रीटमेण्ट करताच येत नाही. चेहऱ्यावर कितीही मेकअप करुन तयारी करण्याचा प्रयत्न केला तरी फेशियल केलं नाही ही खंत मनात राहातेच. पण नैसर्गिक घटकांचा वापर सौदर्यासाठी कसा करता येतो हे सांगणारे तज्ज्ञ पार्लरमध्ये जाऊन फेशियल करता आलं नाही ही खंत घालवणरा उपाय सांगतात.

Image: Google

सौंदर्य तज्ज्ञांच्या मते घरच्याघरी फेशियल करुन पार्लरसारखा किंबहुना त्याहूनही चांगले परिणाम आपण मिळवू शकतो. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यापेक्षा घरच्याघरी फेशियल करण्याचे खूप फायदे आहेत. एकतर फेशियल करण्यासाठी  आपल्याला आपल्या सोयीची वेळ निवडणं शक्य होतं. घरच्याघरी फेशियल करताना केमिकलयुक्त घटकांचा वापर टाळून नैसगिक घटकांचा वापर करता येतो. घरगुती फेशियलमधील नैसर्गिक घटकांच्या वापरामुळे चेहऱ्यावरील फेशियलचे परिणाम पार्लरच्या तुलनेत जास्त दिसून येतात आणि जास्त वेळ टिकतात. पार्लरमध्ये फेशियल करताना चेहऱ्याला चांगला ग्लो हवा असेल तर गोल्डन फेशियल करण्याला प्राधान्य दिलं जातं. पार्लरसारखं गोल्डन फेशियल हे घरच्याघरी दूध, दुधाची साय मध, हळद, गव्हाच्या पिठाचा कोंडा यांचा वापर करुन करणं शक्य आहे. 4 स्टेप्सचं गोल्डन फेशियल घरच्याघरी करण्याला वेळ लागत नाही आणि खर्चही होत नाही. 

घरच्याघरी गोल्डन फेशियल

Image: Google

1. दूध हळदीने करा चेहरा स्वच्छफेशियल घरी करा किंवा पार्लरमध्ये . पहिली स्टेप ही क्लीन्जिंगची आहे. क्लीन्जरनं आधी चेहरा स्वच्छ करुन एक बेस तयार होतो. घरच्याघरी फेशियल करताना क्लीन्जिंगसाठी 2 चमचे कच्चं दूध आणि चिमूटभर हळद घ्यावी. ते चांगल एकत्र करुन कापसाच्या बोळ्यानं मिश्रण चेहेऱ्यास लावावं. थोड्या वेळानं चेहरा थंडं पाण्यानं धुवावा.

Image: Google

2. गव्ह्यचा कोंडा-मध-कच्य्या दुधानं स्क्रब

क्लीन्जिंग केल्यानं त्वचा प्राथमिक स्वरुपात स्वच्छ होते. फेशियलसाठी आपण ज्या घटकांचा वापर करणार असतो त्यांचे गुणधर्म त्वचेत खोलवर रुजण्यासाठी त्वचा खोलवर स्वच्छ होणं गरजेचं असतं. यासाठी स्क्रबचा वापर करुन चेहरा स्वच्छ करणं म्हणजेच एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. या स्क्रबसाठी एक चमचा गव्हाच्या पिठाचा कोंडा, थोडी हळद, मध आणि  कच्चं दूध घ्यावं. कच्च्या दुधाऐवजी गुलाब पाण्याचा उपयोग केला तरी चालतं. सर्व घटक एका वाटीत मिसळून घ्यावेत. हा लेप चेहऱ्याला हलका मसाज करत लावावा.  किमान दहा मिनिटं या मिश्रणानं चेहऱ्याला स्क्रब करणं आवश्यक असतं. मसाज केल्यानंतर थोडा वेळ चेहरा तसाच ठेवावा. आणि मग चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. वरील घटकांचा वापर करुन स्क्रब केल्यानं चेहऱ्याची रंध्रं खोलवर स्वच्छ होतात. त्वचेवरील मृत पेशी, मृत त्वचा निघून जाते. चेहरा स्वच्छ होतो. 

Image: Google

3. कडुलिंबाची पानं घालून वाफ 

क्लीन्जिंग आणि स्क्रब केल्यानंतर वाफ घेणे महत्त्वाचं असतं. वाफ घेतल्यानं चेहऱ्यावाची रंध्र मऊ पडतात. रंध्रातील / खड्यातील घट्ट झालेली घाण मऊ होवून निघून जाण्यास वाफेमुळे मदत होते. ब्लॅकहेडस, व्हाइट हेडस निघून जातात. कडुलिंबाची पानं घालून उकळलेल्या पाण्याची वाफ घेतल्यानं त्वचा निर्जंतुक होते. वाफ घेण्याच्या प्रक्रियेमुळे त्वचा ओलसर होते. 

Image: Google

4. दही- हळद-  बदाम तेलाचा मसाज

वाफ घेतल्यानंतर मऊ झालेल्या त्वचेवर मसाज करावा. मसाज करण्यासाठी दही, थोडी हळद आणि बदामाचं तेल घ्यावं. हे सर्व नीट एकत्र मिसळून घ्यावं. बदाम तेलाऐवजी ऑलिव्ह तेल घातलं तरी चालतं. मिश्रण चेहऱ्यास मसाज करत लावावं. 4-5 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

5. बेसनपीठ- हळद- मधाचा सोनेरी लेप

या सर्व प्रक्रियानंतर सगळ्यात शेवटची आणि चेहऱ्याला विशेष परिणाम देणारी बाब म्हणजे चेहेऱ्यास लेप लावावा. फेशियलच्या गोल्डन इफेक्टसाठी एका वाटीत अर्धा चमचा बेसनपीठ, हळद, मध , थोडं दूध घ्यावं. हे एकत्र करुन त्यात अर्धा चमचा दुधाची साय घालावी. पुन्हा सर्व नीट एकत्र करुन लेप चेहऱ्यास लावावा. हा लेप 15 मिनिटं ठेवावा.  

चेहरा थंडं पाण्यानं धुतल्यानंतर रुमालानं टिपून चेहऱ्यास माॅश्चरायझर लावावं. सौंदर्य तज्ज्ञ सांगतात कोरडी त्वचा असल्यास क्रीम स्वरुपातलं माॅश्चरायझर लावावं आणि त्वचा तेलकट असल्यास लाइटवेट लोशन स्वरुपातलं माॅश्चरायझरनं चेहऱ्याचा हलका मसाज करावा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी